पुणे शहरात आज दिवसभरात नवे ८२७ नवे करोनाबाधित आढळले. तर, १६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

पुणे शहरातली करोना रुग्णांची संख्या आता २६ हजार ९०४ वर पोहचली आहे. आजपर्यंत शहरात ८१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  दरम्यान करोनावर उपाचर घेणाऱ्या ८०८ रुग्णांची तब्येत ठणठणीत झाल्याने, त्यांना घरी पाठवण्यात आले. आजपर्यंत १६ हजार ९९६ जणांनी करोनावर मात केली आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही माहिती देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज ४२७ करोनाबाधित रुग्ण आढळले. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी दोन जण  ग्रामीण भागातील आहेत. शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ७ हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली असून, ६ हजार ९५८ एवढी करोनाबाधितांची संख्या झाली आहे. आज दिवसभरात १४५ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ३ हजार ९९४ जणांनी करोनावर मात केली आहे. तर, आत्तापर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातील १०२ तर ग्रामीण भागातील ३६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ८ हजार १३९ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २२३ मृत्यू मागील चोवीस तासांमध्ये नोंदवले गेले आहेत. या संख्येमुळे महाराष्ट्रातील करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १० हजार ११६ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ४ हजार ३६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या २ लाख ४६ हजार ६०० इतकी झाली आहे. यापैकी १ लाख ३६ हजार ९८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे