करोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे पुण्यात सोमवारी मध्यरात्रीपासून म्हणजे 14 जुलैपासून 10 दिवसांसासाठी लॉकडाउन सुरू झाला आहे. लॉकडाउनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांनाच परवानगी आहे, अशात लॉकडाउन लागू होण्याच्या एक दिवसआधीच मध्यरात्री चोरट्यांनी वाईन शॉप फोडून 2.57 लाख रुपयांची दारू आणि दुकानातील 13 हजार रुपये रोकडही चोरल्याचं समोर आलं आहे.

दुकानाचं शटर उचकटून चोरट्यांनी रोकडसह तब्बल 2 लाख 70 हजारांची दारु चोरुन नेली आहे. याप्रकरणी ताथवडे येथील समीर जैस्वाल (वय 30) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. जैस्वाल यांचे खराडी भागातील जुना मुंढवा रस्त्यावर मद्यविक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचं शटर उचकटून, दाराची काच फोडली आणि दुकानात प्रवेश केला. सोमवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. सकाळी वाईन शॉप उघडण्यासाठी आलेल्या जैस्वाल यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

याप्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे. “सीसीटीव्हीमध्ये तीन चोर दिसत आहेत. त्यांनी रेनकोट आणि मास्क घातले होते. आम्ही सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध घेत आहोत”, असे चंदन नगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक पी.व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.