पुण्यातील धनकवडी भागातील शंकर महाराज मठासमोर एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यासह तिघांविरोधात सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, मारहाण झालेल्या व्यक्तीवर तिघांमधील एका आरोपीला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडीतील शंकर महाराज मठासमोर शैलेंद्र दीक्षित याच्यासोबत शनिवारी सायंकाळी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, अनंत तौर, गिरीश क्षीरसागर, निलेश देगावकर यांचा वाद झाला होता. या दरम्यान, दीक्षित यांना शिळीमकर यांच्यासह तिघांनी बेदम माराहाण केली. दीक्षित याने याप्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत नगरसेवक शिळीमकर यांच्यासह तिघांजणांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार, शिळीमकर यांच्यासह तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच शनिवारी झालेल्या वादावादीदरम्यान, शंकर महाराज मठासमोरील २० रुपयांत पोटभर जेवण या स्टॉलमधील कामगार आनंद तौर याला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शैलेंद्र दीक्षित याच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.