कानाखाली मारल्याचा जाब विचारला म्हणून पुण्यात संगणक अभियंत्याचा धारदार शस्त्रांनी खून केल्याची घटना समोर आली आहे. मंजित प्रसाद असं मृत तरुणाचे नाव असून तो पुण्यातील आयटी पार्क मध्ये डब्लूएनएस कंपनीत काम करायचा. शुक्रवारी मध्यरात्री पिंपरीच्या डीलक्स चौकात त्यांच्यावर वार करण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान काही तासांनी मृत्यू झाला. याप्रकरणी तिघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंजित प्रसाद हे विमान नगर येथील आयटीपार्क मध्ये संगणक अभियंता म्हणून काम करतात. नेहमी प्रमाणे ते कॅब (बस) ने काळवाडीच्या दिशेने जात होते. बस मध्ये अनेक ऍम्प्लॉईज होते. पिंपरीच्या डीलक्स चौकात काही अज्ञात गुंडांनी रस्ता अडवला त्यांनी बस थांबविण्यास बस चालकाला सांगितले.

बस चालका शेजारी मंजित बसले होते. त्यांनी काय झाले असे गुंडांना विचारले असता त्यातील एका आरोपीने त्यांच्या कानाखाली मारली. याचाच जाब विचारण्यासाठी मंजित बसच्या खाली उतरले. तेव्हा गुंडात मंजित यांना पाच जणांनी लथाबुक्यांनी मारायला सुरुवात केली. त्यातील काहींनी धारदार शस्त्रांनी पोटावर आणि छातीवर वार केले यात मंजित गंभीर जखमी झाले.

सर्व कर्मचारी एकत्र गुंडांच्या दिशेने धावल्याने गुंड पळून गेले. मंजित यांना गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु त्यांचा उपचारादरम्यान काही तासांनी मृत्यू झाला आहे. या घटने प्रकरणी तिघाना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.