गेल्या काही महिन्यांपासून देशासह जगभरात करोना विषाणूने थैमान घातलं आहे. दरम्यान, भारतात करोना विषाणूचा प्रादुर्भाव ओसरत असून डॉक्टर दिवसरात्र करोना रुग्णांची सेवा करताना पाहायला मिळत आहे. मावळ परिसरातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांचा वाढदिवस रुग्णालय प्रशासनाने साजरा केला. यामुळे कोविड रुग्ण हा भारावून गेला.

मावळमधील पवना रुग्णालयात गेल्या सात दिवसांपासून एका कोविड रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. मात्र, दोन दिवसांपासून ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. आज त्यांचा वाढदिवस असल्याचं त्यांच्या मुलाने डॉक्टर निपुण यांना फोनवरून सांगितले.

वाढदिवस साजरा करता येत नसल्याची खंत मुलाने डॉक्टरांपाशी बोलून दाखवली. त्यानंतर डॉक्टरांनी कोविड रुग्णाचा वाढदिवस करायचा अस ठरवलं. त्यानुसार पवना रुग्णालयातील डॉक्टर स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी अतिदक्षता विभागाला एका बर्थडे हॉलमध्ये रूपांतर करत सजावट केली. डॉक्टरांनी रुग्णाला सुखद धक्का देत त्यांचा वाढदिवस साजरा केला, यामुळे कोविड रुग्ण भारावून गेले आणि आयुष्यातील एक वेगळा क्षण डॉक्टरांसोबत घालवता आला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. या वाढदिवसामुळे त्यांच्यात एक नवचैतन्य निर्माण झाले होते. त्यांनी समाधान व्यक्त केलं असून लवकरच करोनाला हरवून घरी जाण्याचा निश्चय केला आहे.