पुणे शहरात करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या ही प्रशासन समोर चिंतेची बाब ठरताना दिसत आहे. पुणे पोलीस विभागात १ हजार ११२ जण करोनाबाधित आढळले आहेत. तर सात कर्मचाऱ्यांचा आजअखेर करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले की, मागील सात महिन्यांपासून पोलीस विभागातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहे. प्रत्येक नागरिकाच्या सेवेसाठी पोलीस उपलब्ध राहिले आहेत. मात्र त्याच दरम्यान, १ हजार ११२ पोलीस अधिकारी व कर्मचारी करोनाबाधित झाले आहेत. तर उपचार सुरू असताना सात जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे.

तसेच सद्यस्थितीस १५७ जणांवर उपचार सुरू आहेत. या सर्वांवर आमचे लक्ष असून, वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आम्ही आम्ही सुरुवातीपासूनच कर्मचाऱ्याच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम केले आहे. पोलिसांसाठी बेड राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच, बाधित कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासोबत संवाद साधण्याचे काम आपण करत असुन, सर्व कर्मचार्‍यांच्या कायम पाठीशी असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.