पुणे सासवड रोडच्या मध्यभागी असणाऱ्या कालव्यामध्ये आज सकाळच्या सुमारास जंगलामध्ये आढळणारा सांबर दिसल्याने एकच खळबळ उडाली. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर या सांबरला पकडण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर येथील सासवड रोडवर असणार्‍या कालव्यामध्ये आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सांबर आढळला.

याची माहिती पोलीस, अग्निशामक दल आणि प्राणी मित्रांना देण्यात आली. कात्रज सर्पोद्यान रेस्क्यू सेंटरचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डाट मारून सांबरला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला.

पण सांबर बेशुद्ध झाले नाही अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी जाळी लावून या सांबरला पकडले. सांबरला पकडताना तोंडाला थोडीशी जखम झाली. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला कात्रज उद्यानामध्ये नेण्यात आले आहे.