शहराचा विस्तार वाढल्यामुळे उपनगरातील भागात जमिनींना चांगले भाव आले असून, त्यामुळे पैसा खुळखुळत असल्याने या ठिकाणी गुंडगिरीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. जागेचे व्यवहार करणारे दलाल आणि त्या भागातील गुंडांकडून गावठी कट्टय़ाला (पिस्तूल) मोठी मागणी आहे. भाईगिरीची धुंदी, खिशात खुळखुळणारे पैसे यामुळे एक मोटार आणि गावठी कट्टा असणे हे तरुणांमध्ये ‘मोठेपणा’ चे मानले जात आहे.. त्यातच परराज्यातून येणारे हे कट्टे पाच हजारांपासून ते तीस हजारांपर्यंत मिळत असल्याने अलीकडच्या काळात तरुणांकडे ही शस्त्रे वाढली आहेत.
शहरात शस्त्रे सहज मिळत असल्यामुळे गावठी कट्टा, पिस्तूल बाळगणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढत चालली आहे. यावर पुणे पोलिसांची गुन्हे शाखा नजर ठेऊन असते. गेल्या महिन्यातच गुंडा स्कॉडने पुण्यात विक्रीसाठी पिस्तूल घेऊन येणाऱ्या आरोपींना पकडले होते. त्यांच्याकडून आठ पिस्तूल जप्त करण्यात आली होती. त्याचबरोबर इतर पथकाने सराईत गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडील गावठी कट्टे व पिस्तूल जप्त केली आहेत. या आरोपींकडे केलेल्या तपासात ही अग्निशस्त्र परराज्यातून घेऊन येत असल्याचे समोर आले आहे. त्यातही मध्य प्रदेशातील एका गावातून पुण्यात बहुतांश शस्त्र आणल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर बडनेर जिल्ह्य़ात उमटी हे गाव आहे. या गावात शिकलकरी समाज राहतो. प्रत्येक घरामध्ये गावठी कट्टे बनविले जातात. या गावात बनविलेल्या गावठी कट्टय़ांना फिनिशिंग करण्यासाठी त्यांच्याकडे अत्याधुनिक यंत्रे आहेत. त्यामुळे त्यांचा दर्जा चांगला आहे. पुण्यात यावर्षी जप्त करण्यात आलेल्या गावठी कट्टय़ांपैकी १८ कट्टे हे या गावातून खरेदी केलेले आहेत. समोरचा माणूस पाहून येथील लोक गावठी कट्टे पाच हजार ते तीस हजार रुपयांपर्यंत विकतात. त्याच बरोबर तयार केलेले गावठी कट्टे सराईत गुन्हेगारामरफत पुण्यात आणले जातात. तर काही वेळेला ऑर्डर मिळाल्यानंतर हेच लोक पुण्यात ही शस्त्रे आणून पोहचवितात. हे शस्त्र लपवणे सोपे असल्यामुळे ते सहज बाळगणे शक्य होते. या गावाबरोबरच मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातूनही काही शस्त्रे बनविण्याचे कारखाने आहेत.
‘भाई’ बनण्याचे खुळ डोक्यात शिरल्याने..
कोथरूड येथील करिष्मा सोसायटीजवळील हॉटेल पालखी येथे एका तरुणाने रात्री घुसून गोळी झाडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आकाश प्रकाश पवार (वय १८), रोहित रमेश बलकवडे (वय १९, दोघे रा. गणेशनगर, कोथरूड) यांना अटक केली. त्यांनी पोलिसांना सांगितले की, दहशत निर्माण करून ‘भाई’ बनण्यासाठी हा गोळीबार केला होता. या तरुणांवर पूर्वी एकही गुन्हा दाखल नव्हता. पण, भाई बनण्याचे खुळ डोक्यात शिरल्याने त्याने हे कृत्य केले होते. हे करण्याचा सल्ला त्यांना एका कुख्यात गुन्हेगाराने दिला होता.