नगर रस्त्यावरील बहुचर्चित बीआरटी मार्ग गुरुवारपासून सुरू करण्यात आला असला, तरी या मार्गावरील बीआरटीमधील अनेक त्रुटी अद्यापही दूर करण्यात आलेल्या नाहीत, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. या मार्गातील त्रुटींबाबत वारंवार निवेदन देऊन तसेच चर्चा करूनही महापालिका प्रशासन तसेच पीएमपी प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याचीही तक्रार आहे.
येरवडा (नगर रस्ता) ते वाघोली दरम्यानचा नवा बीआरटी मार्ग गुरुवारपासून सुरू करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. महापौर प्रशांत जगताप, स्थानिक आमदार जगदीश मुळीक, आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृहनेता शंकर केमसे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. या मार्गावरील सुमारे हजारो प्रवाशांसाठी ही सेवा सुरू करण्यात आली असून येरवडा ते वाघोली हा मार्ग १४ किलोमीटर लांबीचा आहे आणि मार्गावर तेरा बीआरटी थांबे करण्यात आले असून परिसरातील पंचवीस मार्गासाठी ही बीआरटी सेवा उपलब्ध होणार आहे. बीआरटीच्या गाडय़ांबरोबरच या मार्गावरील पीएमपीच्या अन्य गाडय़ाही बीआरटी मार्गातूनच मार्गस्थ होणार आहेत.
सर्व बीआरटी मार्गात त्रुटी आहेतच शिवाय प्रवाशांना आणि संबंधितांना चुकीची आणि खोटी माहिती दिली आहे. खोटी माहिती देऊन परवानगी घेऊन हा मार्ग सुरू करण्यात आल्याचा मुख्य आक्षेप आहे. त्यासंबंधीचे निवेदन पीएमपी प्रवासी मंचतर्फे अध्यक्ष जुगल राठी यांनी परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या मार्गातील त्रुटींची पूर्तता करून नंतरच या मार्गावरील बीआरटी सुरू केली जावी, अशी आमची मुख्य मागणी आहे, असे राठी यांनी गुरुवारी सांगितले. एकूण १४ किलोमीटर लांबीचा बीआरटी मार्ग असल्याचे सांगण्यात येत असले, तरी साडेचार किलोमीटर अंतरात बीआरटी मार्गच नाही. तरीही या मार्गाला बीआरटी मार्ग कसे म्हटले जात आहे, असाही प्रश्न राठी यांनी उपस्थित केला आहे. सात किलोमीटर अंतरातही बीआरटी तीन ठिकाणी खंडित करण्यात आला आहे. हा राज्यमार्ग असल्यामुळे या मार्गावर सर्व वाहनांची मोठी वाहतूक असूनही काही प्रमुख ठिकाणी सिग्नलच नाहीत, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
या मार्गावरील सर्व थांब्यांवर प्रवाशांना येणाऱ्या गाडय़ांची माहिती देणारी आवश्यक अशी आयटीएमएस यंत्रणा कार्यान्वित होणे अपेक्षित असले, तरी काही थांब्यांवर ही यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नाही. या मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांसाठी दुभाजक तोडण्यात आले आहेत. तसेच दुभाजक तोडून काही ठिकाणी पदपथ तयार करण्यात आले आहेत. ते अद्याप दुरुस्त झालेले नाहीत. मार्गावर अनेक ठिकाणी पदपथ नाहीत. तसेच जेथे पदपथ आहेत ते अतिक्रमणांनी व्यापले आहेत. त्यामुळे नागरिकांना बीआरटीच्या थांब्यावर जाण्यासाठी किंवा गाडीतून उतरून पुन्हा रस्त्याच्या कडेला जाण्यासाठी त्रासदायक होत आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी व सूचना आम्ही वेळोवेळी केल्या. तशी निवेदनेही दिली. मात्र त्यांची दखल प्रशासनाने योग्यप्रकारे घेतली नसल्याचेच बीआरटी मार्गात दिसत आहे, असेही राठी यांनी सांगितले.

बीआरटी मधून प्रवास करणाऱ्यांची सोय आणि कार्यक्षम बीआरटी सेवा अपेक्षित असताना या दोन्ही गोष्टींकडे लक्ष न देता नगर रस्ता बीआरटी सुरू करण्यात आली आहे. या त्रुटींचे पूर्ण निराकरण करून बीआरटी मार्ग का सुरू करण्यात आला नाही, असा आमचा प्रश्न आहे. त्रुटी दूर करण्याबाबत प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
जुगल राठी, अध्यक्ष, पीएमपी प्रवासी मंच