अभिनेत्री हेमा मालिनी, ईशा आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली गणेशवंदना.. ‘लगान’फेम ग्रेसी सिंग आणि सहकाऱ्यांनी नृत्याद्वारे साकारलेली राधा-कृष्ण लीला.. कला अकादमीच्या कलाकारांनी नृत्याच्या माध्यमातून घडविलेले गोव्याच्या संस्कृतीचे दर्शन.. मराठी अभिनेत्रींनी सादर केलेले लावणी नृत्याचे फ्यूजन… अशा रंगारंग कार्यक्रमांसह नेते आणि अभिनेत्यांच्या उपस्थितीमध्ये ‘पुणे फेस्टिव्हल’चे शुक्रवारी शानदार उद्घाटन झाले.
राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून २६ व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, रजनी पाटील, धर्मस्थळ वीरेंद्र हेगडे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, उद्योजक राहुल बजाज, फेस्टिव्हलचे प्रमुख सुरेश कलमाडी, मीरा कलमाडी, अभिनेते जितेंद्र, रझा मुराद, सचिन पिळगावकर, आफताब शिवदासानी, अभिनेत्री हेमा मालिनी, िबदू, करिष्मा कपूर, सुभाष सणस, कृष्णकुमार गोयल आणि कृष्णकांत कुदळे या वेळी उपस्थित होते.
एखादा महोत्सव २५ वर्षे करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी पैसा लागतो. प्रायोजक शोधायचे हे कष्टाचे काम आहे, अडचणींवर मात करीत कलमाडी यांनी महोत्सव जागतिक स्तरावर नेला असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. पुढची दोन महिने केवळ आमची भाषणे ऐकायची आहेत. त्यामुळे आता फार भाषण करणार नाही, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. राज्यात दुष्काळाची स्थिती असताना गणरायाच्या कृपेने पाऊस पडला. प्रामाणिकपणे पूजा-अर्चा केली तर देव प्रसन्न होतो, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
पुणे फेस्टिव्हल आणि पुणेकरांशी माझे नाते आहे. २३ वर्षे मी कला सादर केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये असल्याने यंदा नवा बॅले सादर करू शकले नाही. पुढील वर्षी मात्र नवा बॅले नक्की सादर करेन, असे हेमा मालिनी यांनी सांगितले. रजनी पाटील म्हणाल्या, दिल्ली ही राजकीय, मुंबई ही आर्थिक तर, पुणे ही बौद्धिक, सामाजिक आणि सांस्कृतिक राजधानी आहे. पुणे आणि कपूर खानदानाचे जुने नाते असल्याने फेस्टिव्हलला उपस्थित राहताना आनंद होत असल्याचे करिष्मा कपूरने सांगितले. सुरेश कलमाडी यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ आणि दूरिया शिपचँडलर यांनी सूत्रसंचालन केले.
गिरगावचा गणपती
गिरगावच्या चाळीत शेजारी राहणाऱ्यांमुळे मराठी बोलता येते आणि तेथील गणेशोत्सवामध्ये भरपूर नाचलो. पुढे चित्रपटामध्येही नाच करायला मिळाला. मी मराठीचा ऋणी आहे, अशा शब्दांत जितेंद्र यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ५० वर्षांनंतरही गणरायाच्या कृपेने माझा प्रवास सुरू आहे. माझा ‘सांगतो ऐका’ चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होत असून पुणेकर माझ्यावर असेच प्रेम करतील, अशी भावना सचिन यांनी व्यक्त केली.