सुशिक्षित वर्गाकडूनही बुरसटलेल्या मानसिकतेचे दर्शन

पिंपरी : मुलगी नको, वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, अशी मानसिकता समाजात आजही आहे. वेगाने विकसित होत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातही तोच प्रकार दिसून येत आहे. मुलगी नको म्हणून सुशिक्षितांकडूनच महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होत असून, बुरसटलेली ही मानसिकता किती खोलवर रुजली आहे, याचा प्रत्यय येतो.

काही दिवसांपूर्वी वाकड येथे घडलेल्या एका घटनेत, पहिली मुलगी असताना दुसऱ्या वेळी मुलगीच होईल, या भीतीने गर्भवती महिलेच्या इच्छेविरोधात तिचा गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले होते. सदर व्यक्तीला पहिल्या पत्नीपासून मुलगी होती, मात्र मुलगा हवा म्हणून त्याने दुसरा विवाह केला. त्यानंतर पहिल्या पत्नीने घटस्फोट द्यावा, यासाठी तो तिला वारंवार त्रास देत होता. याच वादात तिच्या दिराने एके दिवशी पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातच तिचा गर्भपात झाला.

दुसरी घटना, थेरगाव-काळेवाडीत घडली. साडेतीन महिन्यांची गर्भवती असणाऱ्या महिलेच्या पोटावर लाथा मारण्यात आल्याने त्यातच तिचा गर्भपात झाला. मुलगी होईल, असे वाटल्याने हा प्रकार घडल्याचे तेव्हा उघड झाले होते. या घटनेत सदर महिलेला जबर मानसिक धक्का बसल्याने ती मानसिक रुग्ण झाली होती. या प्रकरणी तिच्या पतीला अटकही झाली.

तिसरी घटना सांगवीत घडली. ४६ वर्षांच्या जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने १९ वर्षांच्या तरुणीशी विवाह केला. तिचा लग्नाला विरोध होता, मात्र पालकांनी इच्छेविरुद्ध या शिक्षकाशी तिचा विवाह लावून दिला. त्याचे पहिले लग्न झाले होते आणि पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगी होती. मात्र, आता मुलगा हवा होता आणि पहिल्या पत्नीला आता मूल होणार नसल्याने त्याने दुसऱ्या विवाह केला. दुसऱ्या पत्नीपोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर संबंधित शिक्षकासह १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौथी घटना थेरगावातील आहे. मुलगी होईल, या संशयाने गर्भवती असणाऱ्या पत्नीच्या पोटावर लाथा मारण्यात आल्याची घटना घडली. पौर्णिमेच्या दिवशी ती गर्भवती असल्याचे उघड झाले होते. तिला मुलगीच होणार असा सर्वाचा समज होता. मुलगी नको असल्याने नणंद-सासू मिळून तिचा छळ करतच होते. एके दिवशी पतीनेही पोटावर लाथा मारल्या.

महिला अत्याचाराच्या घटना

* वाकड येथे पहिली मुलगी असताना दुसऱ्या वेळी मुलगीच होईल, या भीतीने गर्भवती महिलेच्या इच्छेविरोधात तिचा गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले.

* थेरगाव-काळेवाडीत साडेतीन महिन्यांची गर्भवती असणाऱ्या महिलेच्या पोटावर लाथा मारण्यात आल्याने त्यातच तिचा गर्भपात झाला.

* ४६ वर्षांच्या एका शिक्षकाने १९ वर्षांच्या तरुणीशी विवाह केला. त्याचा आधीच विवाह झाला होता. मात्र त्याला पहिल्या पत्नीपासून मुलगी झाली होती.

* मुलगी होईल, या संशयाने गर्भवती असणाऱ्या पत्नीच्या पोटावर लाथा मारण्यात आल्याची घटना थेरगाव येथे घडली.