पुणे : मिळकतकरापोटी महापालिके ला एप्रिल महिन्यात १८८ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. शहरातील १ लाख ६९ हजार ४७४ मिळकतधारकांनी कर भरणा के ला आहे. मिळकतधारकांची ऑनलाइन पद्धतीने मोठय़ा प्रमाणावर कर भरणा केल्याची माहिती महापालिकेच्या कर आकराणी आणि कर संकलन विभागाने दिली. ऑनलाइन पद्धतीने ८३.३ टक्के नागरिकांनी १३३ कोटी ४३ लाख रुपयांची रक्कम जमा केली आहे.

दरम्यान, ज्या निवासी मिळकतधारकांनी गेल्या वर्षी करोना कालावधीत एक एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण मिळकतकर भरला आहे त्यांना ३१ मे पूर्वी मिळकतकर जमा के ल्यास शासनाचे कर वगळून अन्य सर्व करांमध्ये १५ टक्क्यांची सवलत मिळणार आहे.

शहरात ११ लाख मिळकतींची नोंद आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षांतील मिळकतकर देयके  छपाई प्रक्रिया पूर्ण झाली असून १ एप्रिल पासून मिळकतधारकांना टपाल खात्यामार्फत देयके  पाठविण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार मिळकतकर भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

शहरातील १ लाख ४० हजार ७२१ मिळकतधारकांनी १३३ कोटी ४३ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा केले आहेत. १७ हजार ११० मिळकतधारकांनी ११ कोटी ८० लाख रुपये रोख स्वरूपात (१० टक्के मिळकतधारक) तर ११ हजार ६४३ मिळकतधारकांनी ४३ कोटी ५३ लाख रुपये धनादेशाद्वारे जमा केले आहेत, अशी माहिती कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.

करातील सवलतीसाठी..

निवासी मिळकतींव्यतिरिक्त ज्या मिळकतधारकांची सर्वसाधारण कराची रक्कम २५ हजारपेक्षा कमी आहे, त्यांना सर्वसाधारण करात १० टक्के  आणि ज्या मिळकतधारकांची सर्वसाधारण कराची रक्कम २५ हजारापेक्षा जास्त आहे, त्यांना ५ टक्के  सवलत देण्यात येणार आहे. त्यासाठी मिळकतकराची संपूर्ण रक्कम ३१ मे पूर्वी भरणे आवश्यक आहे, असे कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले.