नोटाबंदीनंतरची प्राप्तिकर विभागाकडून देशातील पहिलीच कारवाई

नोटाबंदीनंतर नालासोपारा भागात शिवसेनेच्या नगरसेवकाकडून पकडण्यात आलेल्या एक कोटी अकरा लाख रुपयांच्या रकमेवर टाच आणण्याच्या कारवाईवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. प्राप्तिकर विभागाकडून पकडण्यात आलेली एक कोटी अकरा लाखांची रक्कम ‘बेनामी’ असल्याचे सिद्ध करण्यात आले असून नोटाबंदीनंतर देशात झालेली ही पहिली कारवाई ठरली आहे. त्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या पुणे कार्यालयातील बेनामी मालमत्ताविरोधी पथकाने (बीपीयू) विशेष परिश्रम घेतले होते.

गेल्या वर्षी आठ नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर १५ डिसेंबर रोजी नालासोपारा भागातील प्रगतीनगर नाका येथून एक मोटार निघाली असून मोटारीत मोठय़ा प्रमाणावर रोकड ठेवल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली. प्राप्तिकर विभागाच्या पुणे कार्यालयातील ‘बीपीयू’ पथकाचे उपायुक्त मारुती मद्देवाड यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार ठाणे येथील प्राप्तिकर विभागाच्या पथकाने पोलिसांची मदत घेतली आणि तेथे सापळा लावला.पांढऱ्या रंगाच्या संशयास्पद मोटारीला थांबण्याची सूचना करण्यात आली. ‘बीपीयू’ पथकातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या समक्ष मोटारीची पाहणी केली. तेव्हा मोटारीत एक कोटी अकरा लाख पंधरा हजार पाचशे रुपयांची रोकड आढळली. तपासासाठी ही रोकड ताब्यात घेण्यात आली. तेव्हा त्यात नुकत्याच चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा सापडल्या. ही रोकड ४७ लाख रुपये एवढी होती. मोटारीत नालासोपारा भागातील शिवसेनेचे नगरसेवक धनंजय विठ्ठल गावडे (रा. अभिजित अपार्टमेंट, नालासोपारा (पूर्व), जि.पालघर) आणि त्यांचा मित्र सुदर्शन आनंद शेरगर (रा. साई वंदन, नारायणनगर, नालासोपारा (पूर्व), जि.पालघर) होते. त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर रोकड कुठून आणली, याबाबतची चौकशी करण्यात आली. त्यांनी प्रमोद दळवी (रा. मुकुंद निवास, मनवेल फाटा, विरार-पूर्व) यांनी ही रोकड ठेवण्यासाठी दिल्याची माहिती दिली. त्यानंतर दळवी, गावडे, शेरगर यांच्याकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा तिघांकडून समाधानकारक खुलासा करण्यात आला नाही, अशी माहिती प्राप्तिकर विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली.

प्राप्तिकर विभागातर्फे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि चौकशी कामी पुण्यातील प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात बोलाविण्यात आले होते. चौकशीत देखील तिघांकडून समाधानकारक खुलासा करण्यात आला नाही. दिल्ली येथील प्राप्तिकर विभागातील बेनामी व्यवहारासंदर्भातील स्थापन करण्यात आलेल्या निवाडा समितीकडे हे प्रकरण पाठविण्यात आले. त्यामुळे नोटाबंदीनंतर नालासोपारा भागात पकडण्यात आलेली रोकड ‘बेनामी’ ठरविण्याचे आदेश समितीकडून नुकतेच देण्यात आले आहेत. या रकमेवर टाच आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुढे काय होणार ?

नोटाबंदीनंतर देशभरात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत पोलीस तसेच प्राप्तिकर विभागाकडून कारवाई करून मोठय़ा प्रमाणावर रोकड जप्त करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेल्या पैशांमध्ये चलनात आलेल्या दोन हजारांच्या नव्या नोटांचा समावेश देखील मोठय़ा प्रमाणावर होता. प्राप्तिकर विभागाच्या पुणे कार्यालयातील ‘बीपीयू’ पथकाने केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये दोन हजारांच्या नव्या नोटांचा समावेश होता. ही रोकड ४७ लाख रुपये एवढी होती. एकूण मिळून एक कोटी अकरा लाख साडेपंधरा हजार रुपयांच्या रकमेवर टाच आणण्याच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब झाले आहे. या कारवाईनंतर पुढील कारवाई सुरू करण्यात येईल आणि रोकड जप्त करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येईल.