News Flash

डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेवर प्राप्तिकर विभागाचे छापे

पिंपरी व आकुर्डी परिसरात डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचा मोठा पसारा आहे.

देणग्या आणि थकबाकीमुळे संस्थेचा ‘कारभार’ पुन्हा चर्चेत

अभिमत दर्जा असलेल्या कोल्हापूर, पिंपरी आणि नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेच्या कार्यालयांवर बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत वैद्यकीय व अभियांत्रिक महाविद्यालयांतील कागदपत्रांची कसून छाननी सुरू होती. मात्र याचा तपशील सांगण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. पिंपरीतील साहित्य संमेलन असो की पिंपरी पालिकेकडे असलेली मोठी थकबाकी, प्रवेशासाठी देणग्या यांसारख्या वेगवेगळय़ा विषयांवरून सतत वादात राहणाऱ्या डी. वाय. पाटील संस्थेचा ‘कारभार’ या छाप्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

पिंपरी व आकुर्डी परिसरात डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचा मोठा पसारा आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय यासह विविध शाखा व अभ्यासक्रमांसाठी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी येथे येतात. अवाच्या सवा देणग्यांवरून कायम चर्चेत राहणाऱ्या डी. वाय. पाटील संस्थेचे संत तुकारामनगर येथे दंत वैद्यकीय महाविद्यालयही आहे. त्याच्या शेजारीच असलेल्या मुख्य कार्यालयात आयकर विभागाचे पथक दाखल झाले, तेव्हा मोठा पोलीस बंदोबस्त होता. आपली ओळख सांगून अधिकाऱ्यांनी कुलूपबंद असलेले कार्यालय उघडण्यास सांगितले. त्यानंतर हे पथक आत गेले व त्यांनी प्रवेशद्वार लावून घेतले. त्यानंतर कार्यालयात कोणालाही प्रवेश देण्यात येत नव्हता. सुरुवातीला संस्थेचे विद्यार्थी अनभिज्ञ होते. थोडय़ाच वेळात प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व छायाचित्रकार तेथे पोहोचले. त्यानंतर वाहिन्यांवर बातम्या झळकू लागल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना छापासत्राची माहिती मिळाली. उशिरापर्यंत कागदपत्रांची तपासणी सुरू होती. याबाबतची माहिती देण्यास आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली.

पिंपरीत जानेवारीमध्ये झालेल्या अखिल मराठी साहित्य संमेलनाचे आयोजकपद डॉ. डी. वाय. पाटील संस्थेकडेच होते. आतापर्यंत झालेल्या संमेलनांपैकी सर्वाधिक खर्चाचे संमेलन म्हणून पिंपरीच्या संमेलनाकडे पाहिले जाते. पैशाच्या उधळपट्टीवरून संमेलनावर खूपच टीका झाली होती, तेव्हा महिन्याभरानंतर अधिकृत खर्चाचे आकडे जाहीर करू, अशी भूमिका आयोजकांनी घेतली होती. तथापि, अजूनही त्या खर्चाचा हिशेब संस्थेने जाहीर केला नाही. याशिवाय, संस्थेकडे िपपरी पालिकेच्या मिळकतींची मोठी थकबाकी आहे. तथापि, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने एका प्रकरणात ‘जैसे थे’ परिस्थिती आहे. तर संस्थेच्या नियोजित आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या जागेची अडीच कोटींची थकबाकी पालिकेने नुकतीच दंडासह वसूल केली. त्यापाठोपाठ आयकर विभागाने छापासत्र सुरू केल्याने संस्थेचा ‘कारभार’ पुन्हा चर्चेत आला आहे.

पिंपरीप्रमाणेच डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक समूहाच्या कोल्हापूर आणि नवी मुंबई येथील कार्यालयांवरही प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. या वेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही कार्यालयात जाण्यास मज्जाव घालण्यात आला. काही प्रमुख अधिकाऱ्यांची नंतर दोन तास चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून काही कागदपत्रेही ताब्यात घेतली असून त्याची तपासणी सुरू होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 4:35 am

Web Title: income tax department raided on d y patil educational organization
Next Stories
1 कोल्हापूर हद्दवाढविरोधात सतरा गावांत बंद
2 संभाव्य हद्दवाढीचे विधिमंडळात पडसाद
3 कोल्हापुरात मिळकतींचे ‘जी. पी. एस.’ द्वारे सव्‍‌र्हेक्षण
Just Now!
X