आयकर कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. सीबीआयच्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली.
आयकर निरीक्षक सुशील शर्मा आणि सचिन कुमार यांना कोठडीत ठेवण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांचे घर आणि कार्यालयाचीही झडती सुरू आहे. पुण्याच्या आयकर कार्यालयामध्ये अवैधरीत्या पैसे गोळा केले जात असल्याची माहिती सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाला मिळाली. त्यावर कारवाई करीत या पथकाने संबंधित कार्यालयावर धाड टाकून दोघांना अटक केली. विशेष म्हणजे या झडतीमध्ये या पथकाला प्रिंटरमध्ये पैसे सापडले आहेत.
चार लाखांची घरफोडी
भांडारकर रस्त्यावरील दोन सोसायटय़ांमधील चार बंद सदनिका फोडल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. एका सोसायटीतील सोन्याचे दागिने आणि हिऱ्यांचा हार असा चार लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला असून या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
भांडारकर रस्त्यावरील गल्ली क्रमांक १६ मध्ये श्रद्धा अपार्टमेंटमध्ये घरफोडी झाल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता एका सदनिकेमध्ये कपाटाचे कुलूप तोडून ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. रुपा अरुण खारकर यांची ही सदनिका असून त्या कामानिमित्ताने दिल्लीला गेल्या आहेत. त्यांच्या सदनिकेतील सोन्याचे दागिने आणि हिऱ्यांचा हार असा चार लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. याबाबत खारकर यांना कळविण्यात आले असून त्या पुण्यात परतल्यानंतरच चोरीच्या ऐवजाबाबत माहिती मिळू शकेल, असे पोलिसांनी सांगितले. चोरटय़ांनी शेजारी असलेल्या ओम रेसिडेन्सीमधील दोन बंद सदनिकांचे कुलूप तोडले. मात्र, येथे कोणीही राहात नसल्याने चोरटय़ांना हाती काहीच लागले नाही. शेजारच्या सोसायटीतील हेमंत गोखले यांची बंद सदनिका चोरटय़ांनी फोडली असून तेथूनही काही चोरीला गेले नाही.