पुण्यातील कोथरूड व पिंपरी चिंचवड डेपोतील २०० कंत्राटी वाहनचालकांनी अचानक संप पुकारल्यामुळे शहर बससेवेवर परिणाम झाला असून प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. हे सर्व वाहनचालक प्रसन्न पर्पल या ठेकेदाराचे असून गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांनी संप केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, पीएमपीएमएलच्या करारानुसार चालक, डिझेल आणि मेंटेनन्सची जबाबदारी प्रसन्न पर्पलची आहे. मात्र त्यांनी कधीही करारानुसार बसची सेवा दिली नसल्यामुळे पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी त्यांचे पैसे रोखल्याचे सांगण्यात येते. याबाबत मुंढेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

पीएमपीएमएलची जबाबदारी स्वीकारल्यापासून मुंढे यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. प्रसन्न पर्पल ही कंपनी पीएमपीएमएलला बस व वाहनचालकांची सेवा पुरवते. पण करारानुसार ही कंपनी सेवा देत नसल्यामुळे पीएमपीएमएलने त्यांना ऑगस्टपासून पैसे देणे बंद केले होते. त्यामुळे कंपनीलाही कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन देता आले नाही. त्यामुळे वाहनचालकांनी आज सकाळी अचानक संप पुकारला. करारानुसार २०० बसेस पीएमपीएलच्या मालकीच्या आहेत. या बसवर वाहक पीएमपीएमएलचे तर चालक संबंधित कंपनीचे आहेत. पण सेवा व्यवस्थित नसल्यामुळे पीएमपीएमएलने कंपनीला पैसे देणे बंद केले. आता तुकाराम मुंढेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.