बर्ड फ्लूमुळे ग्राहकांनी चिकनकडे पाठ फिरवली असून मटण, मासळीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत बकरे, मेंढय़ा उपलब्ध होत नसल्याने मटण विक्रेत्यांची धावाधाव सुरू झाली आहे. पुणे शहरात मागणी वाढल्याने एक किलो मटणाची विक्री ६६० ते ६८० रुपये दराने केली जात आहे. सांगली, कोल्हापुरात मटणाला मागणी वाढली असली तरी दर स्थिर आहेत.

अवेळी झालेल्या पावसामुळे ओला चारा खाणाऱ्या शेळी, मेंढय़ाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. बकरे, मेंढीच्या वाढीसाठी साधारणपणे अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. साधारणपणे तीन ते साडेतीन महिन्यांनतर एका बक ऱ्याचे वजन दहा किलोपर्यंत भरते. मेंढय़ाचे संगोपन करणे तसे जिकिरीचे आहे. नैसर्गिक अधिवासात त्यांची वाढ होते. मेंढपाळ गावोगावी फिरतात. यंदाच्या वर्षी अवकाळी पाऊस झाल्याने मेंढय़ांच्या गर्भधारणेवर परिणाम झाला. ढगाळ वातावरणात मेंढय़ा आजारी पडतात. या कालावधीत त्या पाणीही पित नाहीत. त्यामुळे मेंढी, बकऱ्यांच्या वाढीवर परिणाम होतो, असे पुणे शहर मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्य़ात चाकण येथील बाजारात मालेगाव, बीड, कोपरगाव, औरंगाबाद येथून मेंढी, बकरे विक्रीस पाठविले जातात. शिरूर तालुक्यातील घोडनदी, यवत, तळेगाव ढमढेरे, अहमदनगर जिल्ह्य़ातील राशीन येथे बाजार भरतात. तेथे मेंढपाळ मेंढी, बकरे विक्रीस पाठवितात.

पौष महिन्यात पश्चिम महाराष्ट्रातील गावोगावी वार्षिक यात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे मटणाला चांगली मागणी आहे. बर्ड फ्लूमुळे चिकनच्या मागणीत मोठी घट झाली असून ग्राहकांकडून मटणाला मागणी आहे. अचानक मटणाच्या मागणीत वाढ झाल्याने मेंढी, बकऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. गावोगावी भरणाऱ्या बाजारातून होणारी मेंढी, बक ऱ्यांची आवक कमी आहे. दहा किलोच्या एका मेंढी, बक ऱ्यासाठी मेंढपाळांना सात हजार रुपये मोजावे लागत आहेत.

– प्रभाकर कांबळे, अध्यक्ष, पुणे शहर मटण दुकानदार संघटना

अवेळी पावसाचा फटका

बकऱ्यांचे मुख्य अन्न चारा आहे. अवेळी झालेल्या पावसामुळे ओला चारा खाणाऱ्या शेळी, मेंढय़ांच्या वाढीवर परिणाम झाला. ओला चाऱ्यामुळे त्यांचे वजन वाढले नाही. थंडीत बकऱ्यांना सुका चारा दिला जातो. साधारण संक्रांतीनंतर नवीन बकरे बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येतात. मागणी आणि पुरवठा याचा समतोल बिघडला आहे. घाटावरील मेंढपाळ कोकणात बकऱ्या घेऊन जातात. नैसर्गिक वातावरणात बक ऱ्यांची वाढ उत्तम होते. यंदा अवेळी झालेल्या पावसामुळे बक ऱ्यांच्या वाढीवर परिणाम झाला, असे मटण विक्रेत्यांनी सांगितले.

बारमाही मागणी

तांबडा-पांढऱ्या रश्शासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरात मटणाला  कायम मागणी असते. कोल्हापुरात मटणाचे दर स्थिर असून मागणी नेहमीसारखी आहे. ६०० रुपये किलो दराने मटणाची विक्री केली जात आहे. बर्ड फ्लूमुळे चिकन विक्रीत अल्पशी घट झाली आहे. चिकनच्या दरात किलोमागे ३० ते ५० रुपयांनी घट झाली आहे. दररोज कोल्हापुरात दीड ते दोन हजार बक ऱ्यांची विक्री होते, अशी माहिती मटण विक्रेत्यांकडून देण्यात आली.

कोंबडय़ांच्या मागणीत घट

सांगलीत हॉटेल, ढाबे चालकांकडून असणाऱ्या चिकनच्या मागणीत घट झाली आहे. बर्ड फ्लूमुळे चिकनच्या दरात घट झाली आहे. सध्या १२० ते १३० रुपये किलो दराने चिकनची विक्री केली जात आहे. मटणाला चांगली मागणी असून मटणाचे दर ६०० ते ६५० रुपये किलोदरम्यान आहेत. आटपाडी, जत, सातारा जिल्ह्य़ातील माण, खटाव, सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला, मंगळवेढा परिसरातील मांडग्याळी जातीच्या बक ऱ्यांना मागणी असते. माणदेशी बकरे माळरानावरील पाला खातात. खवय्यांकडून तेथील मटणाला मागणी असते.