प्रवाशांची मागणी वाढल्यानंतर काही खासगी वाहतूकदारांकडून प्रत्येक वर्षी ठरावीक मार्गावर दीडपट ते दुप्पट भाडेवाढ केली जाते. पाच महिन्यांपूर्वीच प्रवाशांची हिवाळी लूटमार झाल्यानंतर आता खासगी वाहतूकदारांचे उन्हाळी सुटीतील प्रवासासाठी होणाऱ्या आरक्षणाकडे लक्ष लागले आहे. मागणी असलेल्या विविध मार्गावर हळूहळू भाडेवाढ केली जात असून, प्रवाशांच्या उन्हाळी लूटमारीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
दरवर्षी दिवाळी ते नवीन वर्षांपर्यंत व उन्हाळी सुटय़ांमध्ये पर्यटनासाठी किंवा मूळ गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. दिवाळीपेक्षाही उन्हाळ्यात प्रवाशांची मागणी सर्वाधिक असते. खासगी वाहतूकदारांसाठी ही मोठी संधी असल्याने भाडेवाढ करून या संधीचा फायदा घेतला जात असल्याचे चित्र दरवर्षी पहायला मिळते. सध्या खासगी वाहतूकदारांच्या विविध मार्गावरील गाडय़ांचे उन्हाळी सुटीतील आरक्षण सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांची सर्वाधिक मागणी असलेल्या मार्गावर काही खासगी वाहतूकदारांकडून तातडीने भाडय़ामध्ये दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची उन्हाळी लूटमार एप्रिलच्या पहिल्याच आठवडय़ापासून सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
पुण्यातून विदर्भात जाणाऱ्या गाडय़ांना उन्हाळ्यात व दिवाळीतही सर्वाधिक मागणी असते. अमरावती, नागपूर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे या भागात जाणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या गाडय़ांचे आरक्षण आता सुरू करण्यात आले आहे. विदर्भानंतर दुसरा क्रमांक मराठवाडय़ाचा असून, सर्वाधिक मागणी लातूर, नांदेड, उस्मानाबाद, उमरगा, सोलापूर, बार्शी आदी ठिकाणांना असते. औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, कोकण आदी भागातही प्रवाशांची मागणी दिसून येते.
विदर्भात प्रामुख्याने नागपूर व अमरावती या भागात जाण्यासाठी प्रवाशांची स्लीपर कोच प्रकारातील खासगी गाडीला सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे या गाडय़ांचे भाडे हळूहळू वाढविले जात आहे. शाळांना सुटय़ा लागल्यानंतर व ऐन मागणीच्या काळामध्ये दीड ते दुप्पट भाडेवाढ केली जात असल्याचा मागील अनुभव आहे. भाडेवाढ होत असल्याने काही प्रवासी दोन ते तीन महिने आधी खासगी बसच्या आरक्षणाची विचारणा करीत असतात, मात्र बहुतांश खासगी वाहतूकदार उन्हाळी सुटीतील आरक्षण आधी देत नसल्याचा अनुभव येतो. मागणी वाढल्यानंतरच आरक्षण सुरू केले जाते. त्यातून दरवर्षी प्रवासी भरडला जातो. या भाडेवाढीचे खासगी प्रवासी वाहतूकदार समर्थन करतात. वर्षभर इतर वेळेला कमी प्रवासी असतानाही बस संबंधित मार्गावर तोटा सहन करून सोडली जाते, त्यामुळे गर्दीच्या काळात काहीशी भाडेवाढ करून हा तोटा भरून काढला जातो, असे वाहतूकदारांच्या प्रतिनिधींकडून सांगितले जाते.
शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीतील वाहनांचे भाडे परिवहन प्राधिकरणाकडून ठरविले जाते. त्याचप्रमाणे राज्याच्या परिवहन प्राधिकरणाकडून खासगी बसचे भाडेही ठरविले जावे व त्याच भाडय़ात प्रवाशांना सेवा देण्याची सक्ती असावी, अशी मागणी अनेकदा करण्यात येते. मात्र, राज्य शासनाकडून अद्याप त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामध्ये शासनाने लक्ष घालून प्रवाशांची लूटमार थांबवावी, अशी मागणी सध्या करण्यात येत आहे.

प्रवाशांना सेवा देण्याचे ‘एसटी’पुढे आव्हान
खासगी प्रवासी वाहतूकदारांशी स्पर्धा करीत प्रवाशांना सेवा देण्याचे आव्हान यंदाच्या उन्हाळी सुटीतही एसटीपुढे आहे. दिवाळीमध्ये एसटीनेही प्रवाशांकडून अतिरिक्त दराची वसुली केली होती. त्याचप्रमाणे एप्रिलपासून तिकीटदरात एक रुपयाचे शुल्क लावण्यात आले आहे. त्याबाबत काहीशी नाराजी असली, तरी बहुतांश प्रवासी एसटीला प्राधान्य देतो. एसटीच्या यंदाच्या उन्हाळी सुटीमध्ये मागणीच्या मार्गावर जादा गाडय़ा सोडण्याचे नियोजन केले आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणावर गाडय़ा सोडून खासगी वाहतूकदारांच्या भाडेवाढीला काही प्रमाणात रोखले होते. यंदाही हेच आव्हान एसटीला पेलावे लागणार असल्याचे चित्र आहे.