भक्ती बिसुरे

देशातील एक आघाडीचे राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात आरोग्यविषयक सेवासुविधा अद्यापही पुरेशा सक्षम नसल्यामुळे लहान मुले आणि महिलांमध्ये रक्तक्षय तसेच राज्यातील मधुमेह, कर्करोग, पक्षाघात, अतिउच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या संख्येत गेल्या वर्षांत मोठी वाढ दिसून आली आहे. गेल्या पाच वर्षांत मलेरिया मात्र आटोक्यात आल्याचे समाधानकारक चित्र आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नुकताच २०१९ चा राष्ट्रीय आरोग्य अहवाल (नॅशनल हेल्थ प्रोफाईल २०१९) प्रसिद्ध केला. त्यातून राज्यातील आरोग्यविषयक सद्यस्थितीचे अनेक पैलू स्पष्ट झाले आहेत. राज्यात सहा महिने ते पाच वर्षे वयाच्या सुमारे ५४ टक्के बालकांमध्ये रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) असल्याचे आढळले आहे. महिलांमध्ये हे प्रमाण सुमारे ४८ टक्के एवढे आहे. सहा महिने ते पाच वर्षे वयाच्या ५३.८ टक्के बालकांमध्ये अ‍ॅनिमिया आहे. १५ ते ४९ वर्षे वयोगटातील महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचे प्रमाण ४७.९ टक्के एवढे आहे. तसेच ४९.३ टक्के गरोदर महिलांमध्ये देखील अ‍ॅनिमियाचे प्रमाण लक्षणीय असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रीय कुटुंब कल्याण आणि आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार राज्यातील असंसर्गजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या ५८ लाख ५३ हजार ९१५ एवढी आहे. त्यांपैकी एक लाख ५५ हजार ६२८ रुग्णांना मधुमेह, दोन लाख ५० हजार ८७५ रुग्णांना उच्च रक्तदाब, ९७ हजार ६५१ रुग्णांना उच्चरक्तदाब आणि मधुमेहाचे निदान झाले आहे. १६ हजार ८८० रुग्णांना हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विकार, तर चार हजार १५ व्यक्तींना पक्षाघात झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तब्बल १४ हजार १०३ रुग्णांना तोंडाचा, गर्भाशय मुखाचा तसेच स्तनांचा कर्करोग झाल्याचे देखील या अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशभरात असंसर्गजन्य आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांची संख्या तब्बल सहा कोटी ५१ लाख ९४ हजार ५९९ एवढी आहे.

मलेरिया नियंत्रणात

२०१४ ते २०१८ या कालावधीत महाराष्ट्रातील मलेरियाचे प्रमाण नियंत्रणात आल्याचे राष्ट्रीय आरोग्य अहवालातून स्पष्ट झाले आहे. २०१४ मध्ये ५३ हजार ३८५ रुग्णांना मलेरियाचे निदान झाले होते, त्यांपैकी ६८ रुग्णांचा मृत्यू झाला. २०१५ मध्ये ५६ हजार ६०३ रुग्णांना मलेरिया झाला, त्यातील ५९ रुग्ण दगावले. २०१६ मध्ये २३ हजार ९८३ रुग्ण आढळले, त्यातील २६ रुग्णांचा मृत्यू झाला. २०१७ मध्ये मलेरियाचे १७ हजार ७१० रुग्ण आढळले, त्यातील २० रुग्ण मृत्यू पावले. २०१८ मध्ये १० हजार ७२० मलेरिया रुग्णांपैकी १३ रुग्ण दगावले. २०१९ मध्ये राज्यातील प्रमुख शहरांत हे प्रमाण अत्यल्प आहे.