शंभर टक्के निकाल लागलेली महाविद्यालये घटली

पुणे : नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालानुसार राज्यातील शून्य टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांच्या संख्येत वाढ, तर शंभर टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शून्य टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांची संख्या २३ ने वाढली असून, शंभर टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांची संख्या २०६ ने कमी झाली.

यंदा राज्यातील ७१ महाविद्यालयांचा शून्य टक्के आणि २ हजार ९५ महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला. विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रम या शाखांच्या निकालानुसार विज्ञान शाखेतील १९, कला शाखेतील ३१, वाणिज्य शाखेतील १९ आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेतील २ अशा एकूण ७१ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला. तर शंभर टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांची संख्या जवळपास २ हजार ९५ असून, कला शाखेतील २८१, वाणिज्य शाखेतील ६१०, विज्ञान शाखेतील १ हजार १६१ आणि व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ४३ अशा एकूण २ हजार ९५ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला.

गेल्या वर्षीच्या निकालात विज्ञान शाखेतील १०, कला शाखेतील सर्वाधिक २६, वाणिज्य शाखेतील ११, तर व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेतील १ अशा एकूण ४८ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला होता. तर शंभर टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांची संख्या जवळपास २ हजार ३०१ होती. त्यात कला शाखेतील २९०, वाणिज्य शाखेतील ५९४, विज्ञान शाखेतील १ हजार ३५६ तर व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ६१ अशा एकूण २ हजार ३०१ कनिष्ठ महाविद्यालयांनी शंभर टक्के निकाल लावत यश संपादन केले होते.

काही महाविद्यालयांमध्ये परीक्षा देणारे एक-दोनच विद्यार्थी असू शकतात. ते अनुत्तीर्ण झाल्यास निकाल शून्य टक्के लागू शकतो. शंभर टक्के  निकालाच्या बाबतीत बोलायचे, तर निकाल कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे या संदर्भात अधिक काही बोलता येणार नाही.

– डॉ. शकुंतला काळे,अध्यक्ष, राज्य मंडळ

महाविद्यालयांसाठी विशेष उद्बोधन नाही

राज्य मंडळाकडून दहावीच्या परीक्षेत शून्य टक्के निकाल लागलेल्या किंवा कमी निकाल लागलेल्या शाळांसाठी उद्बोधन वर्ग, शिक्षकांसाठी प्रशिक्षण आदी कार्यक्रम घेतले जातात. मात्र, बारावीच्या परीक्षेत कमी निकाल किंवा शून्य टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांसाठी अशी तरतूद नाही.