विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कनिष्ठ संशोधन पाठय़वृत्ती (जेआरएफ) आणि वरिष्ठ संशोधन पाठय़वृत्तीच्या (एसआरएफ) रकमेत वाढ करण्यात आली आहे. या दोन्ही पाठय़वृत्तींमध्ये अनुक्रमे सहा आणि सात हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

विज्ञान, मानव्यता आणि समाजशास्त्र या शाखांमध्ये संशोधन करण्यासाठी यूजीसीकडून ही पाठय़वृत्ती दिली जाते. पाठय़वृत्तीची रक्कम वाढवण्याचा निर्णय यूजीसीने ५३९ व्या बैठकीत घेतला होता. त्या अनुषंगाने या निर्णयाचे पत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

सुधारित रकमेची पाठय़वृत्ती संशोधकांना १ जानेवारी २०१९ पासून लागू करण्यात आली असल्याचे यूजीसीने नमूद केले आहे. आतापर्यंत कनिष्ठ संशोधकांना २५ हजार आणि वरिष्ठ संशोधकांना २८ हजार इतकी रक्कम पाठय़वृत्तीच्या रुपात दिली जात होती. ही रक्कम वाढवून आता अनुक्रमे ३१ हजार आणि ३६ हजार करण्यात आली आहे. आधीच्या रकमेच्या तुलनेत जवळपास २० टक्के वाढ करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या नियमानुसार घरभाडे भत्ता अनुक्रमे ८ टक्के, १६ टक्के आणि २४ टक्के करण्यात आला आहे. संशोधक ज्या शहरात किंवा भागात काम करत असेल, त्यानुसार त्याला घरभाडे भत्ता दिला जाईल.

यूजीसीच्या बाराव्या योजनेतील संशोधन मार्गदर्शक तत्त्वांनुसार इतर नियम, अटी कायम असतील, असेही यूजीसीने स्पष्ट केले आहे.

सातत्याने मागणीनंतर पाच वर्षांनी वाढ

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर देशभरातील संशोधकांनी सातत्याने आंदोलने, पाठपुरावा केल्यानंतर यूजीसीने पाच वर्षांनी पाठय़वृत्तीच्या रकमेत वाढ केली आहे. या पूर्वी २०१४ मध्ये पाठय़वृत्तीची रक्कम वाढवण्यात आली होती. त्यावेळी वाढवलेल्या रकमेच्या तुलनेत आता वाढवलेली रक्कम कमी आहे. त्यावेळी अनुक्रमे नऊ हजार आणि दहा हजारांनी रक्कम वाढवण्यात आली होती.