महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) फेब्रुवारीमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेनंतर राज्य सरकारने दोन वेळा पदसंख्या वाढवली असून, आता ४३१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

आयोगाने डिसेंबर २०१८ मध्ये ११ संवर्गासाठी ३४२ पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर मे महिन्यात पदांमध्ये वाढ करून ४२४ पदसंख्या करण्यात आली. आता परत सात पदांची वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यानुसार भूमी अभिलेख उपअधीक्षक (गट ब) संवर्गातील सात पदांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्या बाबतचे घोषणापत्र आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.  आता राज्य सेवा परीक्षेतून उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, गटविकास अधिकारी अशा विविध १७ संवर्गातील ४३१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.