राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिल्लीत महत्त्वाच्या पदावर बसवण्यासाठी, ताठ मानेने राजकारण करण्यासाठी पक्षाची प्रत्येक जागा निवडून आणण्याची गरज असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिनकर तावडे यांनी पिंपरीत बोलताना केले. अजितदादांच्या कामाची तडफ पाहून विरोधकांना पोटशूळ उठतो व त्यामुळेच मुंडे, सोमय्या यांच्यासारखे नेते खोटे-नाटे आरोप करतात, त्याकडे लक्ष देऊ नका, असे ते म्हणाले.
सातारा येथे होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी पिंपरीतील लोखंडे कामगार भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती, तेव्हा ते बोलत होते. शहराध्यक्ष योगेश बहल, आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, महापौर मोहिनी लांडे, उपमहापौर राजू मिसाळ, पक्षनेते मंगला कदम, माजी महापौर संजोग वाघेरे, दिलीप घुले, शरद बुट्टे, सुरेखा लांडगे, मयूर कलाटे, हर्षल ढोरे आदींसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
तावडे म्हणाले, साताऱ्याच्या मेळाव्यासाठी पिंपरीतून दहा हजार कार्यकर्ते अपेक्षित आहेत. पक्षाने मोठे केले, त्याचे भान ठेवून पक्षाच्या कार्यक्रमांसाठी कार्यकर्त्यांनी हजर राहिले पाहिजे. पदवीधरसाठी अधिकाधिक नोंदणी झाली पाहिजे. पिंपरीतील प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही भूमिका घेऊ. विलास लांडे व योगेश बहल यांनी अनधिकृत बांधकामाचा मुद्दा या वेळी उपस्थित केला. आपली सत्ता असूनही अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा विषय मार्गी लागला नाही, असे होता कामा नये, अशी अपेक्षा लांडे यांनी व्यक्त केली. तर, दिल्ली व पंजाब सरकारने अध्यादेश काढून अशाच पद्धतीचा प्रश्न सोडवल्याचे सांगत पिंपरीत तसे का होत नाही, असा मुद्दा बहल यांनी उपस्थित केला.