बनावट पासपोर्टवरून पुणे ते शारजा प्रवास करणाऱ्या दोन परदेशी व्यक्तींच्या पोलीस कोठडीत एक ऑक्टोबपर्यंत वाढ करण्यात आली आली आहे. या दोघांना बनावट पासपोर्ट देणाऱ्या व्यक्तींची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याचा शोध सुरू आहे.
अन्सारी महेबुब आलम (वय २४, रा. बिहार) आणि गाजी नजबुल हसन (वय २३, रा. आध्रप्रदेश) अशी कोठडीत वाढ केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही आरोपी म्यानमारचे असून बांग्लादेशातून त्यांनी भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याचे समोर आले आहे. त्याच बरोबर बनावट पासपोर्टच्या आधारे शारजाला नोकरीसाठी जात असल्याचे पोलिसांना तपासात समोर आले आहे. मात्र, याबाबत अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या शनिवारी दोघे आरोपी हे बनावट पासपोर्टवर लोहगाव विमानतळावरून शारजाला गेले. शारजा येथे गेल्यावर दोघांचेही पासपोर्ट हे बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणाहून पुण्याला परत पाठविण्यात आले. त्याबाबत शारजाहून पुणे विमानतळावरील अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. पुण्यात उतरल्यानंतर दोघांनाही ताब्यात घेऊन विमातळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यांना २९ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता.