देशातल्या तरूणांपुढे अद्ययावत ज्ञान मिळवण्याचे मोठे आव्हान आहे, सीएमईच्या विद्यार्थ्यांकडे देश मोठ्या आशेने बघतो आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज पुण्यात केले. चांगले अभियंते आणि चांगले जवान अशी दुहेरी जबाबदारी तुमच्यावर आहे, भारतीय लष्कराच्या कौशल्यवृद्धीत तुमचे योगदान मोलाचे असणार आहे. सध्याच्या युगात तंत्रज्ञान बदलते आहे, नव्या संकल्पना पुढे येत आहेत त्यामुळे अज्ञयावत ज्ञान मिळवा असेही मुखर्जी यांनी स्पष्ट केले. सीएमईच्या दिक्षांत समारंभात राष्ट्रपती बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल सी विद्यासागर राव, सीएमईचे कमांडंट लेफ्टनंट जनरल मायकेल मॅथ्यूज, लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी आणि पालक मंत्री गिरीश बापट यांचीही उपस्थिती होती.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संरक्षणासंदर्भातले वातावरण बदलते आहे. माहिती-तंत्रज्ञान, सायबर गुन्हेगारी यामुळे लष्करी आणि डावपेचात्मक कौशल्यांचा वापर करावा लागणार आहे. तसेच परंपरागत आणि अद्ययावत ज्ञानाचा योग्य समन्वय राखून लष्करी सामर्थ्य वाढवा, असे आवाहनही राष्ट्रपतींनी या विद्यार्थ्यांना केले आहे. आज झालेल्या समारंभात राष्ट्रपतींचे मार्गदर्शन मिळाल्याने विद्यार्थीही भारावून गेले होते.