साहेब, तुम्ही चांगल्या प्रश्नाला वाचा फोडली आहे.. आम्ही देखील हेच सांगत होतो; पण वारंवार सांगूनही कोणी लक्ष दिले नाही.. आज ‘लोकसत्ता’मधील तुमचे आवाहन वाचले. आता सर्वानी मिळून आवाज उठवायला हवा. तुम्ही म्हणता तसा प्रकार आमच्या रस्त्यावरही झाला आहे..
‘रस्ते गेले वर, घरे गेली खाली’ हे वृत्त ‘लोकसत्ता’ने गुरुवारी प्रसिद्ध केले आहे. शहरात अनेक भागात रस्ते काँक्रिटीकरणाची जी कामे सुरू आहेत त्यामुळे रस्त्यांची उंची वाढली असून त्या रस्त्याच्या परिसरातील घरे, दुकाने खाली गेली आहेत. या प्रकारामुळे येत्या पावसाळ्यात आणि अन्य काळातही पाणी रस्त्यावरून वाहून जाणे शक्य होणार नाही. शहरात अनेक भागात सुरू असलेल्या या चुकीच्या काँक्रिटीकरणाबद्दल नागरिकांनी माहिती दिल्यास सर्व तक्रारी एकत्र करून प्रशासनाकडे दाद मागण्याचा कार्यक्रम सजग नागरिक मंचने जाहीर केला आहे. त्याबाबत संपर्क साधण्याचे आवाहन प्रसिद्ध होताच मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांच्याकडे शुक्रवारी सकाळपासून विविध भागातील नागरिकांचे कॉल सुरू झाले.
नागरिकांच्या ज्या तक्रारी आल्या त्या शहराच्या सर्व भागातील आहेत. त्यामुळे काही भागांपुरताच हा प्रश्न मर्यादित नाही, तर शहरभर हे प्रकार सुरू असल्याचे दिसत आहे. औंध, बाणेर, पटवर्धन बाग, एरंडवणे, येरवडा, कोथरूड, शिवाजीनगर, हडपसर या आणि अशा अनेक भागातील नागरिकांनी त्यांच्या भागातील माहिती कळवली असून विविध भागातील रस्ते किमान सहा ते आठ इंच उंच झाल्याची नागरिकांची तक्रार आहे, अशी माहिती वेलणकर यांनी शुक्रवारी दिली. गल्लीबोळ किंवा छोटय़ा रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू झाल्यानंतर आम्ही त्या कामाला आक्षेप घेतला होता. अगदी स्थानिक नगरसेवक, संबंधित अधिकारी, ठेकेदार अशा सर्वाशी संपर्क साधून या कामाची गरज नाही, हेही सांगितले होते. तरीही काँक्रिटीकरण करण्यात आले. ते सुरू असताना रस्ता उंच होत आहे, हे आमच्या लक्षात आले. त्यामुळे त्याबाबतही आवाज उठवला. तक्रारी केल्या. मात्र कोणीही दखल घेतली नाही. रस्ते उंच झाले, तर सोसायटीच्या प्रवेशाचा रस्ता मुख्य रस्त्याच्या खाली जाईल. त्यामुळे वाहने आणताना व बाहेर काढताना त्रास होईल, ही बाबही आम्ही निदर्शनास आणून दिली. मात्र त्याकडेही दुर्लक्षच करण्यात आले, अशी माहिती नागरिकांकडून सांगितली जात होती.
काँक्रिटीकरण सुरू झाल्यानंतर तक्रार करूनही दाद दिली गेली नाही. तुम्ही चांगल्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. सर्वानी मिळून एकत्रितपणे लक्ष वेधले तर प्रशासनाला जाग येईल, अशीही आशा नागरिक व्यक्त करत असून काम सुरू झाल्यानंतर जी निवेदने प्रशासनाला दिली होती, त्याच्या प्रतीही काही सोसायटय़ांनी संघटनेकडे पाठवल्या आहेत.

काँक्रिटीकरणासंबंधी तक्रार करण्यासाठी:
सजग नागरिक मंच: ९८५००६३४८०