एकेकाळी शांत शहर, अशी प्रतिमा असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात सध्या सुरू असलेले खुनांचे सत्र काही केल्या थांबण्याची चिन्हे नाहीत. २०१८ या वर्षांत जवळपास ७३ खून झाले असताना चालू वर्षांतील पहिल्या सात महिन्यात ३५ खुनाच्या घटना घडल्या आहेत. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर तरी गुन्हेगारी कमी होईल, असे मानले जात होते. प्रत्यक्षात काहीच फरक पडला नाही, असेच चित्र समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवडसाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर पोलीस ठाण्यांची संख्या वाढून १५ झाली. एक जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ दरम्यान १२ महिन्यात ७३ खून झाल्याचे सांगितले जाते. हा मुद्दा लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा बनला होता. २०१९ मध्ये, एक जानेवारी ते ३१ जुलैअखेर सात महिन्यात ३५ खून झाले आहेत. त्यामुळे शहरातील वातावरण गढूळ झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

कामगारांची नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडकडे आता गुन्हेगारीचे शहर म्हणून पाहिले जाते. शहराची वाढ वेगाने होते आहे. मोठय़ा संख्येने बाहेरील विशेषत: परराज्यातील नागरिक शहरात येत आहेत. त्यांचा गुन्हेगारी कारवायांमध्ये अधिक सहभाग असल्याचे पोलीस तपासात वेळोवेळी उघड झाले आहे. पोलिसांची अपुरी संख्या, गुन्हेगारीला राजकीय आशीर्वाद, पोलिसांची हप्तेखोरी अशी बरीच कारणे आहेत. वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पाश्र्वभूमीवर, पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नाही, सत्ताधाऱ्यांचे पोलिसांवर नियंत्रण नाही, असे आरोप करत राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकावेळी झाला. तसाच तो आगामी विधानसभेसाठीही होणार, अशी स्पष्ट चिन्हे आहेत.

खुनांची प्रमुख कारणे

* पूर्व वैमनस्य

* वर्चस्ववाद

* अनैतिक संबंध

* मालमत्तांचे वाद

* किरकोळ (तत्कालिक) कारणे

काही प्रातिनिधिक घटना

*  पिंपरीतील एका हॉटेलच्या प्रवेशद्वारावर लघुशंका करणाऱ्या आरोपीला जाब विचारण्यावरून झालेल्या वादात एका सिंधी युवकाचा अपहरण करून निर्घृण खून.

*  सांगवीत घटस्फोटित पत्नीविषयी अश्लील शेरेबाजी करणाऱ्या व्यक्तीचा खून.

शहरातील गुन्हेगारी वाढलेली नाही. ती नियंत्रण ठेवण्यात आली आहे. खुनांच्या घटनांमध्ये वेगवेगळी कारणे असतात. पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येते. कायद्यासमोर कोणाचाही मुलाहिजा ठेवला जात नाही.

– रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पिंपरी आयुक्तालय