करोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यास टाळेबंदीचा कालावधी कमी करणे शक्य असल्याचे संशोधकांनी विकसित केलेल्या गणितीय प्रारूपाच्या निष्कर्षातून समोर आले आहे. ‘इंडियन सायंटिस्ट्स रिस्पॉन्स टू कोविड’ या राष्ट्रीय चमूने करोना प्रसारासंदर्भातील गणितीय प्रारूप तयार केले आहे.

करोना विषाणू संसर्गामुळे जगातील बहुसंख्य देश आणि धोरणकर्त्यांसमोर आव्हान निर्माण केले आहे. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी करोना आणि अन्य साथीच्या आजाराच्या प्रसाराचे गणितीय प्रारूप तयार करून अंदाज घेणे हा महत्त्वपूर्ण उपाय ठरू शकतो. त्यामुळे देशातील संशोधन संस्था आणि विद्यापीठांमधील संशोधकांनी एकत्र येत ‘इंडियन सायंटिस्ट्स रिस्पॉन्स टू कोविड’ हा मंच तयार करून करोना प्रसारासंदर्भातील इंडिया सिम गणितीय प्रारूप तयार केले आहे. त्यातील उपगटाचे नेतृत्व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशनचे डॉ. भालचंद्र पुजारी आणि डॉ. स्नेहल शेकटकर करीत आहेत. या गटात चेन्नई येथील गणितीय विज्ञान संस्था आणि बेंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेतील शास्त्रज्ञांचाही सहभाग आहे.

इंडिया सिम हे भारतासाठीचे आत्तापर्यंतचे सर्वांत व्यापक प्रारूप आहे. त्याचा उपयोग करून शहरे, जिल्हे आणि राज्य अशा विविध स्तरावर आरोग्य सेवा संसाधने, उपाययोजनांचे नियोजन करता येऊ शकेल. तसेच साथींमुळे लॉकडाउन, संशयित बाधितांचे विलगीकरण, चाचण्यांची संख्या यांचा परिणाम कसा होऊ शकेल, याची तुलना करणे शक्य आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, साथीच्या आजारात किती खाटांची आणि अतिदक्षता विभागांची गरज पडेल याचा अंदाज बांधता येईल. या प्रारूपानुसार लॉकडाउन वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे विषाणू संसर्गाचा वेग मंदावला आहे, मृत्यूची संख्या कमी झाली आहे. मोठ्या कालावधीच्या लॉकडाउनचा फायदा होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केलेल्या चाचण्या करणे, संसर्ग झालेल्या रुग्णांचे विलगीकरण करणे याची जोड आवश्यक आहे.

“इंडिया सिम या प्रारूपानुसार चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यास लॉकडाउनचा कालावधी कमी करणे शक्य असल्याचे दिसून येते. दक्षिण कोरियाने प्रचंड प्रमाणात चाचण्या करून जवळपास लॉकडाउन न करता करोना संसर्ग रोखण्यात यश मिळवल्याचे दिसते,” असे डॉ. स्नेहल शेकटकर यांनी सांगितले.