लोकसभा निवडणुकांसाठीच्या राज्यातील दुसऱया टप्प्यातील मतदानात पुण्यातील मतदार यादींतील घोळामुळे अनेकांना मतदान करता आले नसल्यामुळे भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी जिल्ह्याधिकारी कार्यलयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. फेरमतदान घेण्यात यावे अशी मागणी शिरोळे यांनी लावून धरली आहे.
लोकसभा निवडणुकांसाठीच्या राज्यातील दुसऱया टप्प्यातील १९ मतदारसंघातील मतदानाला गुरूवारी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, मतदार यादीतील घोळामुळे पुणे शहरात अनेक मतदारांना आपल्या हक्कापासून वंचित रहावे लागले. मतदानाची वेळ संपेपर्यंत वाट पाहूनसुद्धा या मतदारांना मतदान न करता आल्यामुळे आक्रमक पवित्रा धारण करत मतदान संपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्य निवडणूक अधिका-यांच्या कामकाजाचे केंद्र असलेल्या कौन्सिल हॉल या दोन्ही ठिकाणी शेकडो मतदारांनी कार्यालयांना घेराव घातला होता. यावेळी आपल्याला मतदान करू द्यावे, अशी मागणी या मतदारांकडून करण्यात आली होती. दरम्यान यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास उपोषणाला बसणार असल्याचे अनिल शिरोळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे शिरोळे यांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे.