देशभरात स्वातंत्र्यदिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पुण्यातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणाईने सामाजिक उपक्रम राबवत राष्ट्रीय उत्सव साजरा केला. ‘रॉबिन हूड आर्मी ग्रुप’च्या माध्यमातून आयटी क्षेत्रातील तरुणाईने फुटपाथवरील आणि अनाथ आश्रमातील तब्बल १ लाख गरजूंना अन्न वाटप केलं. स्वातंत्र्यदिनी राबवलेल्या त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मागील ३ वर्षांपासून ‘रॉबिन हूड आर्मी ग्रुप’ सामाजिक कार्य करत आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सोशल मीडियात लोकप्रिय असलेल्या फेसबुकच्या माध्यमातून ही तरुणाई एकत्र आली. त्यांनी  ‘रॉबिन हूड आर्मी’ नावाने एक ग्रुप तयार केला. त्यानंतर ग्रुपमधील सदस्यांनी पुणे शहरातील मंगल कार्यालये आणि हॉटेल चालकांशी संपर्क साधून फेकून देण्यात येणारे अन्न गरजूपर्यंत पोहचवण्याचा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाच्या माध्यमातून  पुण्यात दररोज जवळपास १२ ठिकाणी अन्न वाटप केले जाते. स्वातंत्र्यदिनाचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी ‘रॉबिन हूड आर्मी’च्या सदस्यांनी शहरातील विविध भागातील तब्बल १ लाख गरजूंना अन्न वाटप केले.

 

सामाजिक उपक्रमाबद्दल ग्रुपच्या सदस्या भावना चौहान म्हणाल्या की, ‘रॉबिन हूड आर्मी’च्या सामाजिक उपक्रमाची सुरुवात ही देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीतून करण्यात आली. १५ मार्चला या ग्रुपची स्थापना करण्यात आली. पुण्यात २०१५ पासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हे सामाजिक कार्य समाधान देणारे आहे. त्यामुळेच ग्रुपमधील प्रत्येक या उपक्रमात स्वत:ला झोकून देऊन काम करतो.