News Flash

उमेदवाराची चिल्लर, निवडणूक अधिकाऱ्यांचा ‘गोंधळ’

अनोख्या पद्धतीने भरलेल्या अनामत रकमेची पुण्यात चर्चा

प्रातिनिधिक छायचित्र

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाने सर्व उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. बंडखोरी रोखण्यासाठी सर्व पक्षांकडून अद्याप वादग्रस्त प्रभागांसाठीचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र अपक्ष उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केले आहेत. पुण्यातील एका अपक्ष उमेदवाराने निवडणूक अर्ज भरताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक केली आहे. अनामत रक्कम भरण्यासाठी उमेदवाराने चिल्लरचा वापर केल्याने अधिकाऱ्यांना घाम फुटला.

पुण्यातील येरवडा भागातील प्रभाग क्रमांक १ मधील ड वर्गातून धनंजय राजाराम जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अनामत रक्कम म्हणून ५ हजार रुपये भरण्यासाठी धनंजय जाधव यांनी चिल्लर आणली होती. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अनामत रक्कम ५ हजार रुपयांची रक्कम जमा करताना धनंजय जाधव यांनी चिल्लरचा आधार घेतल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यामुळे अनेकांना ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ चित्रपटाची आठवण झाली.

‘महापालिकेची निवडणूक पहिल्यांदा लढवत असून सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड होती. राजकारणात पैसा असेल तरच निवडून येऊ, असा समज सर्व ठिकाणी झाला आहे. हे लक्षात घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाकडे अनामत रक्कम १ आणि २ रुपयांच्या चिल्लर स्वरूपात भरली आली आहे. ही रक्कम नागरिकांकडून गोळा करण्यात आली आहे,’ अशी माहिती धनंजय जाधव यांनी दिली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 8:57 pm

Web Title: independent candidate deposits coins files nomination form for pune municipal corporation election
Next Stories
1 हिंजवडीत तरुणीच्या खुनामुळे कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे – अजित पवार
2 पुण्यात अनर्थ टळला; चांदणी चौकात बसला आग
3 आधी पत्नीवर वार केले; नंतर त्याने ६ वर्षांच्या मुलासमोर जीवन संपवले
Just Now!
X