शाखा कार्यान्वित झाल्यानंतर पहिल्या गुन्ह्य़ाची नोंद

पुणे : शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्य़ांच्या पाश्र्वभूमीवर स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याला मंजुरी मिळाल्यानंतर सायबर पोलीस ठाण्याचे कामकाज मंगळवारपासून सुरू झाले.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात सायबर पोलीस ठाण्याची उभारणी करण्यात आली आहे. पुणे शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्य़ांच्या पाश्र्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून सायबर गुन्ह्य़ांचा तपास करण्यात येत होता. मात्र, सायबर गुन्हे दाखल करण्यासाठी नागरिकांना पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी लागत होती. सायबर पोलीस ठाण्यात सर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्य़ासंदर्भातील तक्रारी स्वीकारण्यात येणार आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात सायबर पोलीस ठाण्याची उभारणी करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले नव्हते. सायबर पोलीस ठाण्याचे कामकाज सुरू झाले. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, सुनील फुलारी, श्रीकांत तरवडे, सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, उपायुक्त सुहास बावचे, बच्चन सिंह आदी याप्रसंगी उपस्थित होते. सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित झाल्यानंतर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर गुन्ह्य़ांसंदर्भातील कामकाज शिवाजीनगर न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चालणार आहे.

ऑनलाइन फसवणूक

गेल्या काही दिवसांपासून शहरात ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे वाढीस लागले आहेत. विविध प्रकारची आमिषे दाखवून फसवणूक केली जात आहे. सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित झाल्यानंतर या प्रकरणांचा तपास जलदगतीने होईल तसेच सायबर फसवणुकीच्या तक्रारी एकाच ठिकाणी स्वीकारल्या जाणार असल्याने तक्रारदारांना पोलीस ठाण्यांच्या पातळीवर येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.