लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे पुण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. विश्वजित कदम यांच्या प्रचारसभेसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या सभांचे आयोजन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
विश्वजित कदम यांच्या प्रचारासाठी विविध भागांत रथ फिरणार असून त्यावर पथनाटय़ सादर केली जाणार आहेत. तसेच केंद्र व राज्य शासनाने राबवलेल्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या चित्रफितीही प्रचाररथातून दाखवल्या जाणार आहेत. या रथाचे उद्घाटन आमदार विनायक निम्हण यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, तसेच प्रसन्न जगताप, ज्ञानेश्वर मुरकुटे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना छाजेड म्हणाले की, लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. त्याच पद्धतीने पुण्यासाठीही जाहीरनामा तयार केला जात असून पाच-सहा दिवसात त्याचे प्रकाशन केले जाणार आहे.
कदम यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सभेचे आयोजन ४ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही सभा होणार आहेत. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याही सभा व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे छाजेड यांनी यावेळी सांगितले.
कदम यांची पदयात्रा, मेळावा
कोथरूड विधानसभा मतदारसंघात एरंडवणे व अन्य भागात आयोजित विश्वजित कदम यांच्या पदयात्रेला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळाला. पदयात्रेचे वाटेत चांगले स्वागत झाले. खिलारेवाडी येथून सकाळी दहा वाजता या पदयात्रेला प्रारंभ झाला. कदम यांच्या प्रचारासाठी डायस प्लॉट परिसरात पंजाबी कल्चरल हॉल येथे मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. आमदार रमेश बागवे, जयदेव गायकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.