भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहात असलेल्या हस्तलिखित स्वरूपातील प्राचीन पोथ्या आणि दफ्तरखान्यातील दुर्मीळ कागदांची वर्गवारी करून सूची तयार करण्याच्या प्रकल्पाला गती मिळत आहे. त्याचप्रमाणे निवडक कागदपत्रांचे मराठी लिप्यंतर करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. राज्य मराठी विकास संस्थेने केलेल्या पाच लाख रुपयांच्या अर्थसाह्य़ातून हे प्रकल्प राबविण्यात येत आहेत.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी स्थापना केलेल्या भारत इतिहास संशोधक मंडळाने ७ जुलै २०१९ रोजी ११० व्या वर्षांत पदार्पण केले. शतकोत्तर दशकाची वाटचाल करताना हे प्रकल्प गतीने पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री. मा. भावे यांनी दिली.

मंडळाकडे ३१ हजार हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह आहे. त्यापैकी १८ हजार पोथ्यांची यापूर्वी सूची करण्यात आली आहे. आता उर्वरित पोथ्यांची सूची करण्याचे काम सुरू आहे. मात्र, एक पोथी उघडल्यानंतर त्या बाडामध्ये आणखी पोथ्या असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे लवकर संपेल असे वाटत असताना हे काम वाढत आहे, असे भावे यांनी सांगितले.

भावे म्हणाले, मंडळाच्या दफ्तरखान्यामध्ये सुमारे तीन लाख कागद आहेत. मा. मो. ओंकार आणि प्रा. सदाशिवराव आठवले हे मंडळाचे माजी पदाधिकारी यातील काही कागदांमध्ये असलेल्या खजिन्याविषयी  दर शुक्रवारी व्याख्याने देत असत. बहुसंख्य कागदांवर मोडी लिपी असल्याने सामान्यांना ते वाचता येत नाहीत. ही बाब ध्यानात घेऊन यापैकी काही कागदांचे मराठी लिप्यंतर करण्यात येत आहे.