25 February 2021

News Flash

तांदूळ निर्यातीत भारत पहिला

चीनवर मात; उत्पादन १२ कोटी टनांवर

(संग्रहित छायाचित्र)

राहुल खळदकर

चीनमध्ये यंदा तांदळाचे मोठे उत्पादन झाले असले, तरी निर्यातीत चीनवर भारताने मात केली.

मोठे उत्पादन झाल्यानंतरही यंदा चीनने तांदळाची आयात केली असून या पार्श्वभूमीवर २०२०-२०२१ या आर्थिक वर्षांत भारतातील तांदळाचे उत्पादन १२ कोटी टनांवर गेले आहे. चालू आर्थिक वर्षांत भारतातून जगभरात १ कोटी ४५ लाख टन एवढी तांदळाची निर्यात अपेक्षित आहे. चीनकडून दरवर्षी जगभरात मोठय़ा प्रमाणावर तांदळाची निर्यात होते. मात्र, यंदा चीनने २२ लाख टन तांदूळ आयात केला आहे.

इतर शेजारी..

यंदा भारतात तांदळाची लागवड मोठय़ा प्रमाणावर झाल्याने उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. चीनमध्ये १४ कोटी ८३ लाख टन एवढे उत्पादन चालू आर्थिक वर्षांत झाले आहे. चीननंतर भारतात तांदळाची मोठय़ा प्रमाणावर लागवड केली जाते. भारतापाठोपाठ यंदा बांगलादेशात ३ कोटी ५३ लाख टन, इंडोनेशियात ३ कोटी ४९ लाख टन, म्यानमारमध्ये १ कोटी २९ लाख टन एवढे तांदळाचे उत्पादन झाले आहे.

निर्यात एक कोटी ४५ लाख टन

यंदाच्या आर्थिक वर्षांत भारतातून जगभरात साधारणपणे १ कोटी ४५ लाख टन एवढी तांदूळ निर्यात होणे अपेक्षित आहे. भारतातून बासमती आणि बिगरबासमती तांदळाची जगभरात निर्यात होते. यंदाच्या हंगामावर करोनाचे सावट असताना भारताकडून मोठय़ा प्रमाणावर तांदळाची निर्यात झाली. यंदा जगभरातील अनेक देशांनी तांदूळ आयात केला. युरोपियन देशांनी २५ लाख टन,  फिलिपिन्सने २३ लाख टन, चीनने २२ लाख टन, अरब देशांनी १५ लाख टन, मलेशियाने ११ लाख टन, बांगलादेशाने १३ लाख टन, बेनिनने ६ लाख टन एवढी तांदळाची आयात केली.

यंदा चीनने तांदळाची कणी मोठय़ा प्रमाणावर मागवली. युरोपातील देशांकडून भारतातील बासमती आणि बिगरबासमती तांदळाला मोठी मागणी आहे. सरकारने निर्यातदार, ग्राहक तसेच शेतक ऱ्यांना आणखी प्रोत्साहन दिले तसेच निर्यातीची नियमावली काही प्रमाणात शिथिल केली, तर निर्यात आणखी वाढेल. त्यामुळे गंगाजळीत मोठय़ा प्रमाणावर परकीय चलनाची भर पडेल आणि तांदूळ शिल्लक राहण्याचे प्रमाण कमी होईल.

– राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फॅम), तांदूळ व्यापारी

कारण काय?

देशात यंदा तांदळाचे विक्रमी उत्पादन झाले असून २०२०-२०२१ या आर्थिक वर्षांत आतापर्यंत तांदळाचे उत्पादन १२ कोटी टनांवर गेले. यंदाही भारतात २ कोटी ८१ लाख टन एवढा तांदूळ साठा शिल्लक आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मार्केट यार्डातील जयराज आणि कंपनीचे संचालक राजेश शहा यांनी दिली.

जगाच्या तुलनेत..   पाऊस तसेच अनुकूल हवामानामुळे उत्तरेकडील राज्यात तांदळाची लागवड मोठय़ा प्रमाणावर झाली आहे. संपूर्ण जगभरात यंदा तांदळाचे उत्पादन ५० कोटी ३१ लाख टन एवढे झाले आहे. भारतात २०१८-२०१९ या आर्थिक वर्षांत तांदळाचे उत्पादन ११ कोटी ६४ लाख टन एवढे झाले होते. २०१९-२०२० मध्ये ११ कोटी ८४ लाख टन एवढे उत्पादन झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 12:31 am

Web Title: india is the first exporter of rice abn 97
Next Stories
1 आरोग्य, शारीरिक शिक्षण परीक्षेबाबत संभ्रम
2 सी-डॅकच्या पुनर्परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन
3 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात
Just Now!
X