01 March 2021

News Flash

ड्रोनने नेले टपाल अन् ‘सेगवे’वर स्वार पोस्टमन!

राज्यस्तरीय टपाल तिकिटांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने..

राज्यस्तरीय टपाल तिकिटांच्या प्रदर्शनावेळी ड्रोनद्वारे टपालाची वाहतूक आणि ‘सेगवे’वरून पोस्टमनच्या प्रवासाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

टपाल खात्याकडे आलेली पत्रे चक्क ड्रोनच्या साहाय्याने योग्य स्थळी पोहोचली अन् टपालाचा बटवडा करीत सायकलवर किंवा पायी हिंडणारा पोस्टमनही ‘सेगवे’ या बॅटरीवर चालणाऱ्या वाहनावर स्वार होत आधुनिक झाला.. टपाल यंत्रणेतील मरगळ झटकून अत्याधुनिक यंत्रणेच्या वापराचे हे प्रात्यक्षिक शनिवारी पुणेकरांना अनुभवण्यास मिळाले. राज्यस्तरीय टपाल तिकिटांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने टपाल खात्याच्या भविष्यातील वाटचालीची चुणूक त्यातून दिसून आली.

टपाल खात्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महापेक्स’ या टपाल तिकिटांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पुणे विभागाचे पोस्टमास्टर जनरल गणेश साळवेश्वरकर, टपाल खात्याच्या सेवा विभागाच्या संचालक सुमिता अयोध्या, इंटरनॅशनल सोसायटी फॉर कलेक्शन ऑफ रेअर आयटम्सचे अध्यक्ष नरेंद्र टोले आदी त्या वेळी उपस्थित होते. २२ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून, त्यात शंभरच्या जवळपास तिकिट संग्रहकांनी सहभाग घेतला आहे.

उद्घाटन सोहळ्यामध्ये ड्रोनद्वारे टपालची वाहतूक आणि सेगवेच्या माध्यमातून टपालचे वाटप करणाऱ्या पोस्टमनच्या प्रात्यक्षिकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. त्याचे उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. टपाल खात्यामध्ये नव्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात मोठे बदल अपेक्षित आहेत. त्याच दिशेने एक पाऊल म्हणून ही प्रात्यक्षिके दाखविण्यात आल्याचे सावळेश्वरकर यांनी या वेळी सांगितले. उद्घाटनाच्या सोहळ्यात बापट म्हणाले, की टपाल खात्याचे जाळे ग्रामीण भागापर्यंत विस्तारलेले आहे. मात्र, टपाल खात्याने आता अत्याधुनिकतेकडे वळण्याची गरज आहे. ग्रामीण भागातही बँकांप्रमाणे सुविधा मिळावी. अत्याधुनिक सेवांनी सुसज्ज कार्यालये सुरू करण्यासाठी पालिका किंवा राज्य शासनाच्या आरक्षित जागांसाठी प्रयत्न करावेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 5:08 am

Web Title: india post use dron
Next Stories
1 पिंपरीत पूर्ववैमनस्यातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या
2 पिंपरीत ८० वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार
3 पुण्यात घरासमोर गाड्या लावण्याच्या वादातून संगणक अभियंत्याची हत्या
Just Now!
X