चीन या शेजारील राष्ट्राशी संरक्षणविषयक आणि लष्करी संबंध सौहार्दपूर्ण असावेत यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
भारत आणि चीन यांच्यातील सीमा प्रश्न प्रलंबित आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि चीनचे पंतप्रधान यांच्यामध्ये यापूर्वी चर्चा झाली आहे. लष्करी पातळीवर नुकत्याच उद्भवलेल्या समस्येसंदर्भात उच्च पातळीवर निर्णय घेऊन सीमेवर सामंजस्य ठेवण्याविषयीचा सन्मानजनक तोडगा निघाला आहे. चर्चेच्या माध्यमातून सीमा प्रश्न सुटू शकतो, असे सांगून अँटनी म्हणाले, ‘जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनशी काही क्षेत्रामध्ये समन्वय आहे. तर, काही क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे. व्यापार, शिक्षण आणि सांस्कृतिक या क्षेत्रांमध्ये संबंध सुधारत आहेत. संरक्षणविषयक आणि लष्करी पातळीवर सौहार्द राहावा यासाठी आता प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जुलै महिन्यात मी चीन दौऱ्यावर जात आहे. यामध्ये परस्पर सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.’
पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांना मिळणारा छुपा पाठिंबा हाच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध आणि शांतता प्रस्थापित करण्यामध्ये अडसर ठरत आहे. दहशतवादी कारवायांचा पाठिंबा काढून घेतला जात नाही तोपर्यंत हे संबंध सुरळीत होऊ शकत नाहीत, असे सांगून अँटनी म्हणाले, भारतातील सरकार आणि जतनेला पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध असावेत असेच वाटते. पाकिस्तानमध्ये सत्तेवर आलेले नवाझ शरीफ सरकार त्यादृष्टीने सकारात्मक पावले उचलेल अशी अपेक्षा आहे.
नक्षलवादी कारवायांचा बीमोड आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य यामध्येच गुंतल्याने लष्कराचे मूळ कार्य बाजूला पडले आहे काय असे विचारले असता संरक्षणमंत्री म्हणाले, नैसर्गिक आपत्ती आली तर मदत कार्यासाठी सदैव लष्कर आघाडीवर असते. लष्कर हे सहकार्य सर्वतोपरी करणारच. मात्र, नक्षलवाद हा विषय लष्कराच्या अखत्यारित येत नसला तरी जवानांना नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.