श्रीपाल सबनीस यांचे शांती आणि सद्भावना सभेतील मत
देशात हिंदूू आहेत म्हणून देशाला हिंदूू राष्ट्र करणार का, मग इतर धर्माचे काय, हिंदूू राष्ट्रवादाबद्दल हिंदूूंमध्येच वाद आहेत. त्यामुळे भारत कधीही हिंदूू राष्ट्र होणार नाही, असे मत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी आकुर्डीत बोलताना व्यक्त केले. ज्या देशातील तरुण ‘आयसिस’कडे वळत असेल, तर तो देश महासत्तेकडे कसा जाईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
‘जमात ए इस्लामी हिंद’ या संघटनेच्या वतीने श्रमशक्ती भवनात आयोजित शांती आणि सद्भावना सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. इकराम खान होते. या वेळी भन्ते राजरतन, अनिसचे सचिव मिलिंद देशमुख, रियाज तांबोळी, संघटनेचे अध्यक्ष उमर फारुकी, पी. एन. जैन, मारुती भापकर, गणेश दराडे, सलीम शिकलगार आदी उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री वाढते आहे. दोन शत्रूंना पेलताना देशातील १८ कोटी मुस्लिमांना, तुम्ही मांस खात असाल तर देशाबाहेर जा, असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. कोणतेही कौर्य देशाला परवडणारे नाही. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला पाहिजे. मुस्लीम समाजाने या देशातील न्यायव्यवस्था, संगीत, कृषी आणि वैज्ञानिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. डॉ. अब्दुल कलाम यांनी देश महासत्ता करण्याचे स्वप्न मांडले होते. देशात खरा हिंदू आणि खरा मुस्लीम कोण यावरून वाद आहेत. धर्मातील संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. माणसाच्या मनात पशुत्व का निर्माण होते, याचा विचार करण्याची गरज आहे. आपल्या मनातील अशांतता संपविण्यासाठी सर्व धर्माची शिकवण महत्त्वाची आहे. कौर्य माणसाला परवडणारे नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2016 12:42 am