विविध देश मिळून उभारत असलेल्या ‘स्क्वेअर किलोमीटर अॅरे’ (स्का) या आंतरराष्ट्रीय रेडिओ महादुर्बिणीच्या प्रकल्पात भारत सदस्य म्हणून सहभागी झाला असून, या दुर्बिणीच्या उभारणीचा आकृतीबंध (डिझाइन) तयार करण्याची महत्त्वाची जबाबदारी भारत पेलणार आहे. त्यासाठीच्या गटाची औपचारिक स्थापना सोमवारी करण्यात आली. त्यासाठी भारताकडून १४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
‘स्का’ ही रेडिओ महादुर्बीण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात विविध देश सहभागी झाले आहेत. भारतातर्फे राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी संस्था (एनसीआरए) त्यात सहभागी झाली होती. मात्र, आता एनसीआरए, आयुका तसेच देशातील विविध संशोधन संस्था आणि विविध विद्यापीठे हे एकत्रपणे एक गट म्हणून या प्रकल्पात सहभागी होणार आहेत. ते भारताचे प्रतिनिधित्व करतील. त्यासाठीची औपचारिक घोषणा पुण्यात सोमवारी झाली. एनसीआरएचे प्रकल्प संचालक  प्रा. एस. के. घोष, आयुकाचे संचालक प्रा. अजित केंभवी यांच्यासह विविध शास्त्रज्ञ या वेळी उपस्थित होते.
एनसीआरएतर्फे पुणे जिल्ह्य़ातील खोडद येथे उभारण्यात आलेल्या महादुर्बीणीच्या तुलनेत ‘स्का’ ही महादुर्बिणीची क्षमता तब्बल तीस पट इतकी मोठी असणार आहे. भारताला खोडद आणि उटी येथील रेडिओ महादुर्बीण उभारण्याचा अनुभव आहे. त्यामुळे ‘स्का’ प्रकल्पात रेडिओ महादुर्बीण उभारण्याचा आकृतिबंध तयार करण्याची जबाबदारी भारत पेलणार आहे. त्यासाठी विविध संशोधन संस्था, विद्यापीठे आणि विविध उद्योगसुद्धा सहभागी होणार आहेत. या प्रकल्पासाठी भारताकडून १४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ३५ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यातील रकमेला मंजुरी मिळाली आहे, असे प्रा. घोष यांनी सांगितले.

भारताला फायदा काय?
या प्रकल्पात सहभागी झाल्यामुळे भारतातील रेडिओ खगोलभौतिकीच्या संशोधनाला चालना मिळेल. विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इतक्या मोठय़ा प्रकल्पात सहभागी होण्याची प्रत्यक्ष संधी मिळणार आहे. त्याचबरोबर यात सहभागी होणाऱ्या विविध उद्योगांना हा अनुभव तर मिळेलच, त्याचबरोबर भविष्यात या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीतील काही कामेसुद्धा मिळू शकतील. त्यामुळे या प्रकल्पात सहभागी होणे हे सर्वच दृष्टीने भारतासाठी उपयुक्त करणार आहे, असे प्रा. घोष यांनी सांगितले.