गृह सुरक्षा दलाच्या जवानांची भावना

पुणे : आतापर्यंत सर्वसामान्य मतदार म्हणून मतदान केल्यानंतर गृह सुरक्षा दलातील काही जवानांनी पहिल्यांदाच जबाबदारीच्या कामाचा अनुभव घेतला. गृहसुरक्षा दलात निवड झाल्यावर महिनाभराचे प्रशिक्षण घेऊन थेट निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती झाल्याने शासकीय व्यवस्था म्हणून बरेच काही शिकायला मिळाल्याची भावना या जवानांनी व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर कोणताही गडबड गोंधळ होऊ नये, यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. त्यात पोलिसांसह राज्य राखीव सुरक्षा दल, गृहसुरक्षा दलाच्या जवानांचाही समावेश होता. सुरक्षेचे काम करतानाच मतदारांना मतदानाची खोली दाखवण्याचे कामही जवानांकडून करण्यात येत होते. राम बोडके आणि स्वप्नील गोगावले हे दोन तरुण जवान नुकतेच गृहसुरक्षा दलात निवडले गेले. त्यांचे पुणे ग्रामीण पोलिसांकडून त्यांना महिनाभराचे प्रशिक्षण देण्यात आले. राज्यभरातील तरुणांपैकी पुण्यातील जवळपास चाळीस जवानांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली.

‘निवडणुकीचे काम किती जबाबदारीचे असते, त्याचा अनुभव प्रत्यक्ष घेण्याची संधी मिळाली. पहिल्यांदाच अशा प्रकारे काम करत आहोत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीचे कर्मचारी आणि सामान्य नागरिक यांच्यातील फरक या नियुक्तीमुळे अनुभवता आला. जबाबदारीचे काम करण्यातून खूप काही शिकायला मिळत आहे,’ अशी भावना राम बोडके आणि स्वप्नील गोगावले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.