वंशाला दिवा हवा या कारणास्तव सासरच्या छळाला कंटाळून तीन मुलींसह आत्महत्या करण्याची परवानगी मागणाऱ्या विवाहितेला भारतीय जैन संघटनेने दिलासा दिला आहे. या विवाहितेला नोकरी लावण्याबरोबरच तिच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेने स्वीकारली असून हा परिवार सोमवारी (१३ जून) पुण्यामध्ये येईल, असे भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा यांनी सांगितले.
दिंद्रुड (ता. माजलगाव, जि. बीड) येथील रहिवासी असलेल्या अनिता विष्णू देवकुळे यांनी ९ मे रोजी मुख्यमंत्र्यांकडे तिन्ही मुलींसह स्वेच्छामरणाची परवानगी मागितली होती. अनिता यांचा विष्णू देवकुळे (रा. डोंबिवली पूर्व, मुंबई) या व्यक्तीशी विवाह झाला आणि त्यांना तीन मुली झाल्या.
वंशाला दिवा म्हणजे मुलगा हवा या कारणास्तव पती, सासू-सासरे यांनी अनिता आणि तिच्या तीन मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे अनिता हिच्या पत्रांवरून स्पष्ट होते. या छळाला कंटाळून मुलींसह आत्महत्या करण्याचा विचार मनात आलेल्या अनिता हिने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यासाठीची परवानगी मागितली होती. ही बातमी समजल्यानंतर भारतीय जैन संघटनेने अनिता आणि तिच्या मुलींचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला असे मुथा यांनी सांगितले.
संस्थेचे बीड येथील पदाधिकारी राजेंद्र मुनोत आणि गौतम खटोड यांनी या गावी भेट दिली. तेथे एका छोटय़ा घरात अनिता आणि तिच्या मुली राहात होत्या. सासरच्या छळाला कंटाळून आठ दिवसांपूर्वीच अनिता माहेरी आली होती. अनिता आणि मोठी मुलगी सोनाली हिच्याशी संवाद साधल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ध्यानात आले. संस्थेच्या वाघोली येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पामध्ये या तीनही मुलींच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची आणि अनिता यांना कामाला लावण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, असेही मुथा यांनी सांगितले.