‘दिलके झरोके में तुझको बिठाकर’ हे गीत ऐकताना महंमद रफी यांच्या मधाळ स्वराबरोबरच या गीतामध्ये वाजलेले पियानोचे सूर रसिकांच्या सदैव स्मरणात राहणारे आहेत. यासारख्या काही हिंदी चित्रपटगीतांमध्ये पियानो हे पाश्चात्य वाद्य अगदी मिसळून गेले आहे, पण याच पियानो या वाद्यावर आता अभिजात हिंदुस्थानी रागदारी संगीताचे सूर पुणेकरांना अनुभवता येणार आहेत.
हिंदुस्थानी शास्त्रीय रागांवर आधारित स्वररचनांचा समावेश असलेला ‘रागा सिंफनी’ हा कार्यक्रम शनिवारी (१६ मे) गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी सात वाजता होणार आहे. प्रसिद्ध पियानोवादक दीपक शहा यांनी या कार्यक्रमात सादर होणाऱ्या स्वररचनांची निर्मिती केली आहे. या कार्यक्रमात पियानोसह व्हायोलिन, व्हायोला, सतार, तबला, बासरी आणि पखवाज या वाद्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमामध्ये स्वरमंचावर २२ कलाकारांचा सहभाग असेल. संगीतप्रेमी रसिकांसाठी हा कार्यक्रम खुला आहे.
पियानो या पाश्चात्य वाद्यावर पाश्चिमात्य संगीताच्या सिंफनी म्हणजेच स्वररचनांचे वादन करणारे काही पियोनिस्ट आहेत. पण, या वाद्यावर अभिजात संगीताचे सूर घेत वादन करणे ही अवघड कला आत्मसात केलेल्या पियानोवादकांची संख्या पाच बोटांइतकी देखील नाही. त्यामुळे मी पियानो हे वाद्य केंद्रस्थानी ठेवून अभिजात संगीतावर बेतलेल्या कार्यक्रमाची निर्मिती केली असल्याचे दीपक शहा यांनी सांगितले. हा माझा उपजीविकेचा व्यवसाय आहे. मात्र, आता आर्थिकदृष्टय़ा स्थिरस्थावर झाल्यानंतर पियानो या वाद्याद्वारे अभिजात संगीत हे उपज अंगाने वाजविता येते का हा माझ्या आत्मिक आनंदाचा भाग आणि साधना म्हणून प्रयोग करीत असल्याचे दीपक शहा यांनी सांगितले.