मुंबई – कन्याकुमारी एक्सप्रेसवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील चोरटय़ांच्या टोळीला लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले. चोरटय़ांकडून तीक्ष्ण शस्त्रे तसेच २५ मोबाइल संच जप्त करण्यात आले.

ओंकार राजू खरात (वय १९,रा. बारामती), रोहित  शंकर पाटील (वय २०, रा. पिंपळे गुरव), कुमार सुभाष खंडागळे (वय ३१, रा. दहिफळ, जि. उस्मानाबाद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी त्यांचे साथीदार अंकुश पवार, गफार शेख, मुकेश उर्फ बिहारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-कन्याकुमारी एक्सप्रेस गाडी दौंड रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर थांबली होती. त्यावेळी खरात, पाटील, खंडागळे, त्यांचे साथीदार पवार, शेख आणि बिहारी तीक्ष्ण शस्त्रे घेऊन अंधारात थांबले होते. रेल्वे गाडीतील डब्यात शिरून चोरटे प्रवाशांना लुटणार असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मौला सय्यद, मिलिंद झोडगे, जगदीश सावंत, अनिल दांगट, सुरेश रासकर यांनी सापळा लावला. महिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात सहा चोरटे शिरले. पोलिसांच्या पथकाने त्यातील तिघांना पकडले. झटापटीत अंधाराचा फायदा घेऊन तिघेजण पसार झाले. चोरटय़ांकडून तपासात २५ मोबाइल संच, कोयता, लोखंडी गज, मिरची पूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.