ऑनलाइन तिकीट काढणाऱ्यांना सर्वाधिक जाच

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्यास त्यासाठी तिकिटात आकारलेली रक्कम प्रवाशांना परत देण्याची तरतूद रेल्वेकडून करण्यात आली असली, तरी रक्कम परत मिळविताना जाचक अटी आणि नियमांमुळे प्रवाशांची फरफट होत आहे. ऑनलाइन पद्धतीने तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना या प्रक्रियेत सर्वाधिक जाच होत आहे. त्यामुळे अनेकजण याबाबत तक्रार करण्यास धजावत नसल्याने रेल्वेचे फावते आहे. त्यामुळे रक्कम परत देण्याची पद्धती सोपी आणि सुटसुटीत करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.

रेल्वे गाडय़ांमधील वातानुकूलित डब्यातील यंत्रणा बंद असल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने येत असतात. यापूर्वी काही प्रवाशांनी या गैरसोयीबाबत थेट न्यायालयात धाव घेऊन नुकसान भरपाई मिळविली आहे. त्यामुळे यंत्रणा बंद असल्यास त्यासाठी तिकिटात आकारलेली रक्कम परत करण्याचा नियम रेल्वेकडून करण्यात आला आहे. वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याच्या स्थितीत प्रवासी वातानुकूलित प्रथम श्रेणीने प्रवास करीत असेल, तर त्याला प्रथम श्रेणी आणि वातानुकूलित श्रेणीतील फरकाची रक्कम परत देण्यात येते. अशाच प्रकारे टू-टायर, थ्री- टायरसाठी स्लीपर कोच आणि चेअर क्लाससाठी द्वितीय श्रेणी आदींतील फरकाची रक्कम परत देण्याचा नियम करण्यात आला आहे.

बहुतांश प्रवासी सध्या रेल्वेचे आरक्षण ऑनलाइन पद्धतीने करतात. या प्रवाशाला पैसे परत मिळविण्यासाठी अक्षरश: मोठय़ा जाचाला सामोरे जावे लागते. डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्यास संबंधित प्रवाशाला प्रवास संपल्यानंतर वीस तासांच्या आत ऑनलाइन पद्धतीनेच त्याबाबत अर्ज दाखल करणे सक्तीचे आहे. त्यापूर्वी वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याबाबत गाडीतील तपासणी कर्मचाऱ्याकडून शेरा घ्यावा लागतो. त्यानंतर हे प्रकरण इंडियन रेल्वे कॅटिरग अ‍ॅण्ड टूरिझम कार्पोरेशनकडे जाते. तेथून संबंधित विभागात ही माहिती येते. या विभागातील अधिकारी संबंधित प्रकरणाची स्वत: चौकशी करून त्याबाबत खात्री करतो. या सर्व प्रक्रियेनंतरच फरकाची रक्कम प्रवाशाच्या खात्यात जमा होते. या किचकट प्रक्रियेमुळे गैरसोय होऊनही अनेक प्रवासी तक्रारच करीत नसल्याचे दिसून येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railway online ticket scam
First published on: 22-07-2018 at 01:21 IST