राज्य शासनानेअकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फे री राबवली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी होणार असल्याचा उल्लेख असल्याने ही फेरी राबवली जाण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने आपलाच निर्णय फिरवला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई महानगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद येथे अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. दरवर्षी या प्रक्रियेत गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांनी अर्जात दिलेले महाविद्यालयांच्या प्राधान्यक्रमानुसार नियमित फेऱ्या, त्यानंतर रिक्त जागांवर विशेष फेऱ्या आणि त्यानंतर उर्वरित जागांवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फे ऱ्या राबवल्या जातात.

मात्र यंदा करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रियेचा कालावधी कमी करण्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य फेरी न राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने २३ जूनला घेतला होता. मात्र शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी ६ जानेवारीला केलेल्या ट्विटमध्ये विशेष फे रीनंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीचे आयोजन होणार असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे रद्द केलेली फेरी राबवली जाण्याचे संकेत मिळत आहेत.

शालेय शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या त्यांच्या ट्विटमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीचा उल्लेख आहे. मात्र ही फेरी राबवण्याबाबत शासनाकडून अद्याप मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. शासनाकडून ही फेरी राबवण्याच्या सूचना आल्यास त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

फेरी राबवल्यास आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी राबवण्यास विरोध केला आहे. यादव म्हणाले, की प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्य शासनाने २३ जूनला घेतलेल्या निर्णयानुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी रद्द केली होती. मग आता ही फेरी राबवण्याचा निर्णय का घेतला जात आहे, हा प्रश्न आहे. या फेरीमुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांची संधी हिरावली जाते. त्यामुळे ही फेरी राबवल्यास आंदोलन करण्यात येईल.