चालक, सहायकांस टोल नाक्यांवर लसीकरणाची मागणी

पुणे : करोनाच्या प्रादुर्भाव वाढत असताना प्राणवायूबरोबरच जीवनावश्यक वस्तू, औषधांच्या वाहतुकीसाठी रात्रंदिवस कार्यरत असलेले वाहनांवरील चालक आणि सहायक मात्र करोना लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. करोना योद्धे म्हणून या मंडळींचे प्राधान्याने लसीकरण व्हावे आणि त्यासाठी टोल नाक्यांवर व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे.

दुसऱ्या लाटेमध्ये सध्या करोनाचा कहर वाढला आहे. त्यातच प्राणवायू, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर वैद्यकीय वस्तूंचा तुटवडा सध्या जाणवत आहे. राज्याच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या भागातून सध्या प्राणवायूसह इतर वस्तू आणल्या जात आहेत. याशिवाय नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठीही विविध साहित्याची वाहतूक करण्यात येत आहे. राज्यात आणि देशात हजारो वाहनांच्या माध्यमातून ही वाहतूक केली जात आहे. वाहनांवरील चालक आणि सहायक रात्रंदिवस कार्यरत आहेत. ही व्यवस्था यापुढेही सुरळीत ठेवण्यासाठी चालक आणि सहायकांचेही तातडीने लसीकरण होण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे.

करोना कालावधीतकाही चालकांनाही करोनाची लागण झाली असल्याचे राज्य वाहन मालक-चालक प्रतिनिधी महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. करोना योद्धे म्हणून संबंधित घटकालाही विमा संरक्षण मिळावे, अशी मागणीही मांडण्यात आली आहे. देशाच्या विविध भागात लागणारे अत्यावश्यक साहित्य पुरविण्यासाठी वाहतूकदारांकडून पूर्णपणे प्रयत्न करण्यात येत आहे. देशभरात दोन कोटीहून अधिक वाहतूकदार कार्यरत असून, त्याच्याकडील चालकांसाठी मोफत लसीकरणाची व्यवस्था व्हावी. त्यादृष्टीने टोल नाके बंद करून त्या ठिकाणी तातडीने लसीकरणाची व्यवस्था पुरविण्यात यावी. त्याचप्रमाणे टायर, बॅटरी, गॅरेज, वाहनांचे सुटे भाग आणि महामार्गालगतचे धाबे सुरू ठेवण्यात यावेत, अशी मागणी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे.

करोना प्रादुर्भावात वाहतूकदारांचे चालक प्राणवायूसह जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी कार्यरत आहेत. त्यातील काहींना करोनाची लागणही होत आहे. अशा स्थितीत करोना योद्धे म्हणून या मंडळींचेही तातडीने लसीकरण होणे आवश्यक आहे. टोल नाक्यांवर त्यासाठी व्यवस्था उभारावी. त्याचप्रमाणे वाहतूक व्यवसायाला पूरक व्यवसायही सुरू होणे आवश्यक आहे. – बाबा शिंदे, अध्यक्ष, राज्य वाहन मालक-चालक प्रतिनिधी महासंघ