पुणे : भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध दृढ करण्यासह शिक्षण, संशोधन आणि नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी सुरू झालेल्या ‘इंडो- फ्रेंच नॉलेज समिट’च्या आयोजनाचा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला आहे. पुढील वर्षी(२०२१) ४ आणि ५ मार्चला ही परिषद होणार असून, फ्रान्स आणि भारत सरकारचे उच्चस्तरीय अधिकारी, शिक्षण संस्था, संशोधन संस्था, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचा परिषदेत सहभाग असेल.

फ्रान्सच्या मुंबईतील महावाणिज्य दूत सोनिया बार्बरी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विद्यापीठाच्या नवसंकल्पना केंद्राच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर, फ्रेंच दूतावासातील अधिकारी ऑलिव्हर फुडूम, फिलिप गुलियन आदी या वेळी उपस्थित होते. अवकाश विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्यवस्थापन अशी नऊ प्रमुख क्षेत्रे आणि संबंधित विषयांवर या परिषदेत चर्चा केली जाईल, विद्यापीठांशी सामंजस्य करार केले जातील,  विविध विषयांवरील एकत्रित संशोधन प्रकल्प राबवण्यासंदर्भातील ठराव केले जातील.

बार्बरी म्हणाल्या, ‘भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध दृढ आहेत. अवकाश विज्ञान, संरक्षण अशा क्षेत्रांत एकमेकांचे सहकार्य घेत आहेत. दोन्ही देशांसाठी विद्यापीठे आणि संशोधन हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांना एकत्र येऊन काम करणे शक्य आहे. पुणे हे शिक्षणाचे केंद्र असल्याने ही परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घेण्याचे ठरले. या पूर्वीच्या दोन परिषदांमध्ये सुरू झालेले प्रकल्प पुण्यात होणाऱ्या तिसऱ्या परिषदेत सादर केले जातील. ही परिषद फलदायी ठरेल, अशी अपेक्षा आहे.’

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला या परिषदेच्या आयोजनाचा मान मिळणे ही आनंदाची बाब आहे. विद्यापीठ अन्य संस्थांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करेल. या परिषदेमुळे विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, नव्या विषयांसंदर्भातील अभ्यासक्रम, काही महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेता येतील. या पूर्वीच्या दोन परिषदांमुळे एव्हिएशन, इलेक्ट्रिक मोबिलिटी संदर्भातील दोन अ‍ॅडव्हान्स्ड सेंटर निर्माण झाली. त्यामुळे या परिषदेतूनही शिक्षण, संशोधन, विज्ञानासंदर्भातील महत्त्वपूर्ण घडामोडी होऊ शकतील, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.

पहिल्यांदाच विद्यापीठात परिषद

फ्रान्सच्या अध्यक्षांनी २०१८ मध्ये भारताला भेट दिली होती. त्या वेळी फ्रान्स दूतावासातर्फे ही परिषद आयोजित केली होती. पहिली परिषद २०१८ मध्ये दिल्लीत आणि २०१९ मध्ये फ्रान्समधील लिऑन येथे झाली. आता २०२१ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणारी परिषद पहिल्यांदाच एखाद्या विद्यापीठात होणार आहे.