इंद्रायणी नदी प्रदूषित करण्यामध्ये सर्वाधिक वाटा पिंपरी महापालिकेचा आहे, असा आरोप स्थायी समितीचे अध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केला आहे. आतापर्यंत नदीलगतचे रहिवासी व आळंदीकरांकडून होत असलेल्या या आरोपाला खुद्द स्थायी समिती अध्यक्षांनी दुजोरा देत महापालिकेला घरचा आहेर दिला आहे.
इंद्रायणी सेवा संघाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विठ्ठल वीर, मारुती महाराज कुऱ्हेकर, राजाभाऊ रंधवे, डॉ. ज्ञानेश्वर थोरात, डॉ. नारायण महाराज जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. लांडगे म्हणाले, गंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्राकडून भरीव निधी खर्च होतो आहे. गेल्या सरकारने राज्यातील सर्वच नद्यांच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष केले. इंद्रायणीच्या प्रदूषणात िपपरी पालिका तसेच एमआयडीसीचा जास्त हातभार आहे. यावर उपाय शोधण्याऐवजी वेळोवेळी बोटचेपे धोरण ठेवण्यात आले. नव्या सरकारकडून आपल्याला सकारात्मक अपेक्षा आहेत. इंद्रायणी व पवना नदीचे पावित्र्य टिकवण्यासाठी कडक धोरण तयार करण्यासाठी प्रयत्न करू. गंगेसाठी जसा निधी उपलब्ध करून देण्यात आला, त्याच पद्धतीने या नद्यांसाठी निधी मिळावा यासाठी प्रयत्न करू, असे ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2015 3:00 am