25 November 2017

News Flash

इंद्रायणी नदीचे प्रदूषण ‘जैसे थे’

पिंपरीच्या महापौरांनी तातडीने बैठक घेतली, भाजप आमदारांनी पाठपुरावा सुरू केला.

प्रतिनिधी, पिंपरी | Updated: May 19, 2017 4:19 AM

लोकसत्ता टीम

मुख्यमंत्र्यांची तंबी, बैठका, पाहणी दौऱ्यानंतरही कार्यवाही नाही

तीर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदीचे प्रदूषण म्हणजे पिंपरी पालिकेचे पाप आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचले. त्यानंतर, बऱ्यापैकी सूत्रे हलली. पिंपरीच्या महापौरांनी तातडीने बैठक घेतली, भाजप आमदारांनी पाठपुरावा सुरू केला. महापालिका आयुक्त व महापौरांनी आळंदीत येऊन पाहणी केली. मात्र, तरीही नदीप्रदूषणात फरक पडलेला नाही. माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा तोंडावर आहे. नदीतील हेच दूषित पाणी भाविक तीर्थ म्हणून प्राशन करतात. अशा परिस्थितीत, इंद्रायणीचे जलप्रदूषण चिंतेचा विषय बनला आहे.

महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून आळंदीची ओळख आहे. पालखी प्रस्थानासाठी जवळपास पाच लाख भाविक आळंदीत दाखल होतात. एकादशी, आषाढी व कार्तिकीची यात्रा तसेच लग्नाचा हंगाम या निमित्ताने लाखोंच्या संख्येने वारकरी, नागरिक येत असतात. १७ जूनला माउलींच्या पालखीचे प्रस्थान आहे व त्याची जोरदार तयारी आळंदीत सुरू आहे. मात्र, इंद्रायणीच्या प्रदूषणाची समस्या कायम आहे. पिंपरी पालिकेच्या हद्दीतील सांडपाणी तसेच रसायनमिश्रीत पाणी थेट नदीत सोडण्यात येते. यामुळे नदी प्रदूषित झाली आहे, ही जुनीच तक्रार आहे. यावरून पिंपरी पालिका व आळंदीत बराच संघर्ष झाला असून राजकीय पातळीवरही आरोप-प्रत्यारोप झालेले आहेत. मात्र, मूळ विषय कायम राहिला आहे.

दोन महिन्यांपूर्वी, वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आळंदीत आले होते. तेव्हा आळंदीत होणारा दूषित पाणीपुरवठा हे पिंपरी-चिंचवडचे पाप आहे, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे पिंपरी पालिकेचे कान टोचले होते. पिंपरीचे नवे ‘कारभारी’ आमदार महेश लांडगे व शहराचे महापौर नितीन काळजे तेव्हा यावेळी व्यासपीठावरच होते. कोटय़वधी जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. येथे येणाऱ्या वारकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याची गरज आहे. मात्र इंद्रायणी नदीची अवस्था पाहवत नाही. नदीचे दूषित पाणी हे पिंपरी पालिकेचे पाप आहे. जे नदीच्या माध्यमातून वाहात आले आहे. पिंपरी-चिंचवडमधून स्वच्छ पाणी निघाले पाहिजे, जेणेकरून तेथील घाण इकडे येणार नाही, याचा प्रयत्न करा, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले होते. पिंपरी, आळंदी भाजपकडे असल्याचा दाखला देत स्वच्छ पाणी देण्याचे पुण्य आपल्याकडे घ्या, मिळून काम करा, असे आवाहनही त्यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या नाराजीची दखल घेत महापौरांनी संबंधित विभागाची तातडीने बैठक घेतली. त्यानंतर, आमदार लांडगे यांनी पुढाकार घेतला. महापौर व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यानंतरही आळंदीतील इंद्रायणी प्रदूषणाच्या परिस्थितीत बदल झालेला नाही. यासाठी योग्य ती कार्यवाही तातडीने व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कारखान्यांतील रसायनमिश्रीत पाणी नदीत

आळंदीच्या मुख्याधिकाऱ्यांनी ३ मे २०१७ रोजी पिंपरी पालिकेला पत्र दिले आहे. चिखली, कुदळवाडी, तळवडे आदी भागातील कारखान्यांमधील मैला व रसायनमिश्रीत पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नाल्याद्वारे थेट इंद्रायणी नदीत सोडले जाते. त्यामुळे इंद्रायणी नदीपात्रातील पाणी दूषित व पिण्यास अयोग्य असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

आळंदीला दिवसाआड दोन लाख लिटर पाणीपुरवठा?

पिंपरी पालिकेच्या वतीने काही दिवसांसाठी आळंदीला दिवसाआड दोन लाख लीटर पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी (१९ मे) होणाऱ्या सभेपुढे मांडण्यात आला आहे. आळंदी नगरपरिषदेस पिंपरी महापालिकेकडून आषाढी व कार्तिकी वारीसाठी सात दिवस दररोज ५० हजार लीटर याप्रमाणे अडीच रुपये प्रतिहजार लीटर या दराने पाणी देण्यात येते. पालखी सोहळ्यासाठी याच दराने जवळपास एक महिन्याकरिता दिवसाआड दोन लाख लीटर इतका पाणीपुरवठा करणे शक्य आहे, असे सांगत पिंपरी पालिकेने यासाठी तयारी दर्शवली आहे.

First Published on May 19, 2017 4:13 am

Web Title: indrayani river pollution