सिम्बायोसिस महाविद्यालयामध्ये एमबीएच्या वर्गात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने दोन जणांनी विद्यार्थ्यांची २३ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सध्या दोन प्रकरणे उजेडात आली असून, या प्रकारे आणखी काही विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
विनोद नारायणदास मोर (वय २३, रा. गोपी किसननगर, संतोषी माता मंदिर, जालना) या विद्यार्थ्यांने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्याच्यासह ईशान राकेशकुमार खरे (वय २३, रा. राधिका एम्प्स, जगतानगर, वानवडी, पुणे) याचीही याच प्रकारे फसवणूक झाली आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकीत वर्मा (वय अंदाजे २८) व अखिल राणे (वय अंदाजे ३० ते ३५) असे नाव सांगून या दोघांनी विद्यार्थ्यांची फसवणूक केली. त्यांच्या गळ्यामध्ये सिम्बायोसिस महाविद्यालयाची ओळखपत्रही अडकविलेली होती. त्यामुळे ही फसवणूक नियोजनबद्धपणे करण्यात आली असल्याचे बोलले जाते.
संबंधित दोन आरोपींनी विनोद याच्याकडून सिम्बायोसिसच्या लवळे येथील महाविद्यालयात एमबीएला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने १५ लाख ७९ हजार ८०० रुपये घेतले. त्याचप्रमाणे राकेश याला सिम्बायोसिसच्या खडकी येथील महाविद्यालयात एमबीएच्या प्रवेशाचे आमिष दाखविण्यात आले होते. राकेश याच्याकडून आरोपींनी सुमारे साडेसात लाख रुपये घेतले. दोघांचे मिळून एकूण २३ लाख २९ हजार रुपये घेऊन आरोपींनी पोबारा केला.